Satara: चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गावरील संरक्षक कठड्याला धडकून रिक्षा उलटली, वृद्ध ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 19:15 IST2024-07-15T19:15:28+5:302024-07-15T19:15:41+5:30
मुराद पटेल शिरवळ : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळ (ता.खंडाळा) येथे एसटी स्टँड समोर असणाऱ्या पुलावर रिक्षा उलटून एक वृद्ध ठार ...

Satara: चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गावरील संरक्षक कठड्याला धडकून रिक्षा उलटली, वृद्ध ठार
मुराद पटेल
शिरवळ : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळ (ता.खंडाळा) येथे एसटी स्टँड समोर असणाऱ्या पुलावर रिक्षा उलटून एक वृद्ध ठार झाला. तर एकजण जखमी झाला. वसंत हरिभाऊ पोळ (वय ६५, रा.बोरीव पोस्ट रहिमतपूर ता.कोरेगाव) असे मृताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (दि.१५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रिक्षा चालक नवनाथ पोळ हे वडील आजारी असल्याने कुटूंबियांसमवेत रिक्षा (क्रं-एमएच-४३-बीसी-८३८५) मधून कोरेगाव बाजूकडे येत होते. दरम्यान, शिरवळ गावच्या हद्दीत नवनाथ यांचे रिक्षावरील नियंत्रण सुटून रिक्षा महामार्गावरील संरक्षक कठड्याला धडकून रिक्षा उलटली. अपघाताची माहिती मिळताच तत्काळ शिरवळ पोलीस स्टेशनचे कर्मचारी व शिरवळ रेस्क्यू टिमच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले.
मात्र, वसंत पोळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर जखमी सुनेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृत वसंत पोळ यांचे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली आहे. याबाबत प्रीती पोळ यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक नयना कामथे हे अधिक तपास करीत आहे.