हनी ट्रॅपमध्ये अडकवून साताऱ्यातील वृद्धाला लुबाडले, दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 18:18 IST2025-07-19T17:59:37+5:302025-07-19T18:18:19+5:30
दोन वर्षांपासून प्रकार : शहर पोलिसांत तक्रार

हनी ट्रॅपमध्ये अडकवून साताऱ्यातील वृद्धाला लुबाडले, दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले
सातारा : सातारा शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या वृद्धाला दोन वर्षांपासून हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुबाडण्याचा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा संबंधित वृद्धाने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर टोळीतील दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांच्या माहितीनुसार शहर परिसरात राहणाऱ्या एका वृद्धाची एका महिलेशी दोन वर्षांपूर्वी ओळख झाली. ओळख वाढल्यानंतर महिलेने वृद्धाकडे पैसे मागण्यास सुरुवात केली. आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर वृद्धाकडून आणखी पैसे वसूल करण्यासाठी संबंधित महिलेने आपल्या टोळीत आणखी महिला व इतर काही जणांना सामावून घेतले. त्यानंतर वृद्धाशी भेटायला गेल्यानंतर त्यांनी संबंधित महिलेसोबत त्या वृद्धाचे फोटो काढले.
वृद्ध व त्या महिलेचे आक्षेपार्ह फोटो टोळीने वृद्धाला दाखवले. हे फोटो पाहिल्यानंतर वृद्ध घाबरला. त्यामुळे टोळीने त्यांना ब्लॅकमेल करत वारंवार सोने व पैशाची मागणी केली. टोळीची मागणी सातत्याने वाढत गेली. या मागण्यांना वैतागून अखेरीस शुक्रवारी वृद्धाने शहर पोलिस ठाणे गाठून या सर्व प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी या प्रकरणात सहभागी असणाऱ्या दोन महिलांना ताब्यात घेतले.