99th Marathi Sahitya Sammelan: जागतिक पटलावर साताऱ्याची नोंद; अमेरिकन खासदारही साहित्य संमेलनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 16:57 IST2026-01-01T16:55:57+5:302026-01-01T16:57:08+5:30
99th Marathi Sahitya Sammelan: सोहळ्याचे वैशिष्ट ठरणार : श्रीनिवास ठाणेदार यांच्या साहित्यकृतीचे प्रकाशन

99th Marathi Sahitya Sammelan: जागतिक पटलावर साताऱ्याची नोंद; अमेरिकन खासदारही साहित्य संमेलनात
सातारा : सातारा शहरातील ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विविध अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार असून, अमेरिकन खासदार श्रीनिवास ठाणेदार हेही या संमेलनाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशनही संमेलनात होईल. यामुळे साताऱ्याच्या संमेलनाची नोंद जागतिक पटलावरही पुन्हा अधोरेखित होणार आहे.
सातारा शहरात तब्बल ३२ वर्षांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे हे संमेलन भव्यदिव्य करण्यासाठीचे सर्व प्रयत्न झालेले आहेत. आता गुरुवारी (दि. १ जानेवारी) संमेलनाला सुरुवात होईल. त्यापूर्वीच पूर्ण व्यवस्था आणि तयारीही झाली आहे. तसेच हे संमेलन वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण करणे आणि साताऱ्याच्या या संमेलनाची दखल कायमस्वरुपी घेतली जावी यासाठी विविध बाबीही करण्यात येत आहेत.
वाचा : संमेलनात प्रथमच १० माजी अध्यक्ष, रसिकांत अमाप उत्साह
गुरुवारपासून चार दिवस चालणाऱ्या या संमेलनात महाराष्ट्रातून रसिक येणार आहेत. पण, विशेष म्हणजे अमेरिकेमधील खासदार श्रीनिवास ठाणेदार हेही आवर्जून साताऱ्याच्या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन हे ‘प्रकाशन कट्टा’ या कार्यक्रमात होणार आहे.
यावेळी आताच्या संमेलनाचे अध्यक्ष ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांच्यासह विविध मान्यवरही उपस्थित राहणार आहेत. अमेरिकन खासदार श्रीनिवास ठाणेदार हे सातारा संमेलनात येणार असल्याने याची दखलही सर्वत्र घेतली जाणार आहे. तसेच सातारकरांसाठीही ही अभिमानाची बाब असणार आहे.