गादीबरोबरच विचारांचाही वारसा चालवावा, सचिन सावंतांची शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर नाव न घेता टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 15:57 IST2025-04-02T15:55:53+5:302025-04-02T15:57:05+5:30

स्थानिक स्वराज संस्था निवडणूक पुढे ढकलली जातेय..

Along with the throne the legacy of ideas should also be carried forward, Sachin Sawant criticizes Shivendrasinhraje without naming him | गादीबरोबरच विचारांचाही वारसा चालवावा, सचिन सावंतांची शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर नाव न घेता टीका

गादीबरोबरच विचारांचाही वारसा चालवावा, सचिन सावंतांची शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर नाव न घेता टीका

सातारा : ‘राज्य आणि देशही छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालतो. मात्र, छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानादिवशी वाढदिवस साजरा होतो, यासारखी वेदनादायी गोष्ट नाही. त्यांनी गादीबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचाही वारसा चालवावा,’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर नाव न घेता केली.

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते. यावेळी जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण-पाटील, जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, राजेंद्र शेलार, प्रा. विश्वंभर बाबर आदी उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार सातारा जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक म्हणून प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर प्रथमच साताऱ्यात आल्यानंतर सावंत यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली.

प्रदेश सरचिटणीस सावंत म्हणाले, काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे तळमळीचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांना महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. राज्यात आता काँग्रेसच्या मजबूत संघटनासाठी बदलाची प्रक्रिया सुरू झालेली आहे; पण राज्य आणि देशात सुरू झालेले राजकारण हे देशाला अस्ताकडे नेणारे आहे. विरोधी पक्षच संपविण्याचा प्रयत्न होतोय. जाती, धर्मात संघर्ष व्हावा, अशीच भूमिका आहे. देशात ११ वर्षांपासून भाजप सत्तेत असून, लोकशाही वाईट स्थितीत आलेली आहे. यासाठी काँग्रेसला रस्त्यावर उतरून विरोध करावा लागणार आहे. अशावेळी राज्यातील जनतेलाही काँग्रेसला साथ द्यावी लागेल. कारण, विरोधी पक्षच राहिला नाहीतर जनतेच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडणाराच कोणी राहणार नाही.

इतर पक्षांतील नेत्यांची गरजच काय? 

जगातील मोठा पक्ष म्हणून भाजप सांगते. मग, त्यांना इतर पक्षांतील नेत्यांची गरजच काय? असे सांगून सचिन सावंत पुढे म्हणाले, निवडणुकीतील आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही. लाडक्या बहिणींना २ हजार १०० रुपये दिले नाहीत. महाराष्ट्र तर कर्जात बुडालाय, उद्योग क्षेत्रात पिछेहाट झाली आहे, हे सर्व सोडून औरंगजेबच्या कबरीचा, दिशा सालियान सारखे प्रश्न उपस्थित करून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविले जात आहे. राज्यातील सरकारने १०० दिवसांच्या कार्यक्रमात दंगे आणि विद्वेषाचेच राजकारण केले आहे.

स्थानिक स्वराज संस्था निवडणूक पुढे ढकलली जातेय..

या पत्रकार परिषदेत सचिन सावंत यांनी पत्रकारांच्याही विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्ष मजबूत करणार आहे. यासाठी बूथपर्यंत पोहोचणार आहोत. संविधानावरील आक्रमण रोखण्यासाठी लोकांनीही काँग्रेसला साथ द्यावी, असे स्पष्ट केले. तर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या प्रश्नावर सावंत यांनी ही निवडणूक सरकारी वकिलांच्या माध्यमातून पुढे ढकलली जात आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही आवश्यक तेथे एकत्र येणार आहाेत. तरीही काँग्रेस नेतृत्व ठरवेल त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल, असे उत्तर दिले.

Web Title: Along with the throne the legacy of ideas should also be carried forward, Sachin Sawant criticizes Shivendrasinhraje without naming him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.