Alcohol seized from Goa seized, youth arrested: Local crime branch action | गोव्याहून आणलेला दारूसाठा जप्त, युवकाला अटक
गोव्याहून आणलेला दारूसाठा जप्त, युवकाला अटक

ठळक मुद्देगोव्याहून आणलेला दारूसाठा जप्त, युवकाला अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सातारा : गोव्याहून दारूचा बेकायदा साठा विक्रीसाठी आणताना स्थानिक गुन्हे शाखेने एका युवकाला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून सुमारे साडेचार लाखांचा दारूसाठा जप्त करण्यात आला असून, ही कारवाई वाढे फाट्यावर मंगळवारी रात्री करण्यात आली.

राहुल रमेश खलाटे (वय २७, रा. जयमल्हार सोसायटी खेड, सातारा) असे अटक झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, गोवा राज्यातून एका कारमधून दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या टीमला तत्काळ सापळा लावण्याच्या सूचना दिल्या.

मंगळवारी रात्री एलसीबीच्या टीमने वाढेफाट्यावर सापळा लावला. त्यावेळी कऱ्हाड बाजूकडून आलेल्या कारला थांबविण्यात आले. या कारची पोलिसांनी झडती घेतली असता कारमध्ये विविध कंपनीच्या दारूचे बॉक्स आढळून आले.

राहुल खलाटे याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने गोव्याहून आणलेली दारू अहमदनगर येथे विक्रीसाठी नेणार होतो, असे सांगितले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून सुमारे साडेचार लाखांचा दारूचा साठा जप्त केला आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, हवालदार सुधीर बनकर, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, विशाल पवार, विक्रम पिसाळ, विजय सावंत यांनी ही कारवाई केली.

Web Title: Alcohol seized from Goa seized, youth arrested: Local crime branch action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.