सातारा : आईच्या मृत्यूनंतर जखमी मुलानेही सोडले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 15:53 IST2018-09-22T15:44:05+5:302018-09-22T15:53:01+5:30
महाबेळश्वर-मेढा रस्त्यावर दोन दुचाकीस्वारांची लागलेली रेस मायलेकरांच्या जीवावर बेतली. दुचाकीच्या धडकेत रंजना कृष्णा शेलार (वय ५०, रा वागदरे, ता. जावळी) यांचा मृत्यू होऊन दोन दिवस उलटत नाहीत तोच या अपघातात जखमी झालेला त्यांचा मुलगा सागर (वय २०) याचाही शनिवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सातारा : आईच्या मृत्यूनंतर जखमी मुलानेही सोडले प्राण
मेढा : महाबेळश्वर-मेढा रस्त्यावर दोन दुचाकीस्वारांची लागलेली रेस मायलेकरांच्या जीवावर बेतली. दुचाकीच्या धडकेत रंजना कृष्णा शेलार (वय ५०, रा वागदरे, ता. जावळी) यांचा मृत्यू होऊन दोन दिवस उलटत नाहीत तोच या अपघातात जखमी झालेला त्यांचा मुलगा सागर (वय २०) याचाही शनिवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशा प्रकारे मायलेकारांचा मृत्यू झाल्याने जावळी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक महिती अशी की, महाबळेश्वर येथे राहणारा अक्षय राजेंद्र शिंदे (वय २१) आणि त्याच्या मित्राने महाबळेश्वरहून येताना दुचाकीची रेस लावली. अक्षयच्या पाठीमागे एक युवती बसली होती. दोन्ही दुचाकीस्वार अत्यंत वेगात वाकडी तिकडी गाडी करत रस्त्यावरून भरधाव निघाले होते.
याचवेळी समोरून दुचाकीवरून सागर शेलार व त्याची आई रंजना शेलार हे दोघे वागदरे येथून गवडी येथे येत होते. गवडी हे रंजना यांचे माहेर असून, त्या त्यांच्या भावाला भेटावयास निघाल्या होत्या.
गवडी येथे दत्त मंदिरानजीक असलेल्या पुढचीवाडी वस्तीनजीक सागर शेलार हा गाडी वळवत असताना अक्षय शिंदे याने सागर शेलारच्या गाडीला समोरून जोरदार धडक दिली. यावेळी गाडीवर मागे बसलेल्या रंजना शेलार या फेकल्या गेल्याने दगडावर आदळल्या.
यात त्यांच्या डोक्याला मार लागून त्या जागीच ठार झाल्या. तर सागरही गंभीर जखमी झाला होता. दरम्यान त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना सागरचाही मृत्यू झाला.