सातारा : मुलीची प्रसूती घरीच करून अर्भकाचे शिर केले धडावेगळे, पीडित मुलीच्या बापाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 11:32 IST2023-03-09T11:31:44+5:302023-03-09T11:32:12+5:30

अत्याचार करणाराही गजाआड

After giving birth to the girl at home and killed the father of the victim was arrested satara | सातारा : मुलीची प्रसूती घरीच करून अर्भकाचे शिर केले धडावेगळे, पीडित मुलीच्या बापाला अटक

सातारा : मुलीची प्रसूती घरीच करून अर्भकाचे शिर केले धडावेगळे, पीडित मुलीच्या बापाला अटक

कऱ्हाड (जि. सातारा) : अत्याचारानंतर साडेआठ महिन्यांची गर्भवती असलेल्या मुलीची घरीच प्रसूती करून जन्मलेल्या बाळाचे शिर धडावेगळे करीत ते नाल्यामध्ये टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ढेबेवाडी पोलिसांनी पीडित मुलीच्या बापाला ताब्यात घेऊन अटक केली, तर मुलीवर अत्याचार करणाऱ्याच्याही मुसक्या आवळल्या.  

ढेबेवाडी भागातील एका गावातील अठरा वर्षीय मुलीला ३ मार्च रोजी अचानक पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला नजीकच्या रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी तिची सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी मुलगी ८ महिने २१ दिवसांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. मात्र, याबाबतची कसलीही माहिती पोलिस ठाण्यात न देता आई, वडील मुलीला घेऊन घरी गेले. त्याचदिवशी दुपारी अचानक मुलीला प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यावेळी आई व वडिलांनी घरातच प्रसूती केली. जन्म झाल्यानंतर अर्भक रडू लागले. 

शेजाऱ्यांना समजायला नको म्हणून मुलीच्या वडिलांनी त्या अर्भकाचे तोंड दाबून घरातील पारळीने त्याचे शिर धडावेगळे केले. तसेच शिर आणि धड पिशवीतून निर्जनस्थळी नेऊन नाल्यामध्ये टाकले. अर्भक टाकून दिल्यानंतर पीडित मुलीला घेऊन तिचे आई-वडील सांगलीला निघाले होते. मात्र, मुलगी गर्भवती असल्याची माहिती पोलिस ठाण्यात समजल्यानंतर पोलिसांनी त्या तिघांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. मुलीकडे पोलिसांनी विचारणा केली असता, तिने अत्याचार करणाऱ्याची माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित आरोपीला अटक केले. दरम्यान, या घटनेबाबत कळताच परिसरात एकच खळबळ उडाली. 

...असा झाला घटनेचा खुलासा!
अत्याचाराचा गुन्हा दाखल केल्यानंतर मुलगी गर्भवती आहे, असे समजून पोलिस वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मुलीला घेऊन कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात गेले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली. मात्र, मुलीच्या पोटात गर्भ नसल्याचे आढळले. त्यामुळे चक्रावलेल्या पोलिसांनी मुलीला विश्वासात घेऊन गर्भाबाबत विचारणा केली असता, प्रसूती झाल्याचे सांगून वडिलांनी त्या अर्भकाचे शिर धडावेगळे करीत ते नाल्यात टाकून दिल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

Web Title: After giving birth to the girl at home and killed the father of the victim was arrested satara