Satara Crime: खुनाच्या गुन्ह्यात जेलमधून सुटताच केली कंपनीत चोरी; दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 16:44 IST2025-10-15T16:42:58+5:302025-10-15T16:44:12+5:30
एकजण पहिल्यांदाच अडकला

संग्रहित छाया
सातारा : खुनाच्या गुन्ह्यात कारागृहातून जामीन मिळाल्यानंतर साथीदारांना सोबत घेऊन एका कंपनीत ॲल्युमिनियमच्या ६९ विटा चोरणाऱ्या रेकाॅर्डवरील संशयितासह स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल तसेच एक कार, असा सुमारे १ लाख ८७ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
विजय शंकर पवार (वय ३५, रा. रामाचा गोट, मंगळवार पेठ, सातारा), अशोक मोहन मोरे (वय ३२, रा. कोर्टी, ता. कराड) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तर गणेश ऊर्फ गोट्या लहू बोंडे (वय ४९, मूळ रा. पाली, ता. कराड, सध्या रा. काशीळ, ता. सातारा) असे संशयित फरार आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेंद्रे (ता. सातारा) येथील एका ॲल्युमिनियम फाॅन्ड्री कंपनीमधील ॲल्युमिनियमच्या ६९ विटा दि. ९ रोजी रात्रीच्या सुमारास चोरीस गेल्या होत्या. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, रेकाॅर्डवरील संशयित आरोपी विजय पवार याने त्याच्या दोन साथीदारांना सोबत घेऊन ही चोरी केल्याचे पोलिस निरीक्षक अरूण देवकर यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलिस उपनिरीक्षक परितोष दातीर यांच्या अधिपत्याखाली हवालदार हसन तडवी, मनोज जाधव, अमृत कर्पे, प्रवीण कांबळे, अमित माने, शिवाजी भिसे, प्रवीण पवार यांचे पथक नेमले. या पथकाने संशयित विजय पवार याला सातारा शहर परिसरातून शोध घेऊन ताब्यात घेतले. तो खुनाच्या गुन्ह्यातून नुकताच जेलमधून जामिनावर सुटला.
गणेश बोंडे हा त्या कंपनीत काही महिन्यांपूर्वी काम करीत होता. त्याने कंपनीतील विटा चोरीसंदर्भात सर्व माहिती त्याला दिली. त्यानंतर पवार याने अशोक मोरे आणि गणेश बोंडे यांना मदतीला घेऊन संबंधित कंपनीतून ॲल्युमिनियमच्या विटा चोरल्या. चोरीच्या विटा मोरे याच्याकडे ठेवल्या होत्या. त्या पोलिसांनी हस्तगत केल्या. पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक डाॅ. वैशाली कडूकर यांनी या कारवाईतील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले.
दोघांवर गुन्हे, एकजण पहिल्यांदाच अडकला
संशयित विजय पवार आणि गणेश बोंडे या दोघांवर यापूर्वी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. मात्र, अशोक मोरे हा प्रथमच या चोरीच्या गुन्ह्यात अडकला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.