सातारा झेडपीच्या ३५ गुरुजींवरील कारवाईचा लॉट लवकरच !, बदलीत लाभ मिळण्यासाठी बोगस प्रमाणपत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 20:00 IST2025-08-25T19:59:28+5:302025-08-25T20:00:08+5:30
कारवाई अटळ; शिक्षकांत खळबळ..

सातारा झेडपीच्या ३५ गुरुजींवरील कारवाईचा लॉट लवकरच !, बदलीत लाभ मिळण्यासाठी बोगस प्रमाणपत्र
सातारा : बदलीत लाभ मिळण्यासाठी दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी सुरूच असून, नवीन यादीत २७ पैकी १७ गुरुजींचे प्रमाणपत्र अपात्र असल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे आतापर्यंत ८९ प्राथमिक शिक्षकांच्या प्रमाणपत्रात बोगसपणा स्पष्ट झाला आहे. त्यातच या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढल्याने काही दिवसांतच २५ ते ३५ गुरुजींवर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक विभागांतर्गत काही शिक्षकांनीबदलीत लाभ मिळण्यासाठी स्वत:च्या तसेच कुटुंबातील व्यक्तीचे दिव्यांग आणि आजारपणाचे प्रमाणपत्र दिले आहे. शिक्षण विभागाकडे अशा ५८२ प्रमाणपत्रांची माहिती प्राप्त झाली आहे. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी या प्रमाणपत्रांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पडताळणी सुरू झाली आहे.
आतापर्यंत ४१७ दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. यामध्ये ३७९ शिक्षक प्रत्यक्षात उपस्थित राहिले. त्यातील २६४ जणांचे प्रमाणपत्र योग्य दिसून आले आहे. तर सोमवारच्या अहवालानुसार आणखी दिव्यांगाची १७ प्रमाणपत्रे अपात्र ठरली आहेत. यामुळे आतापर्यंत ८९ शिक्षकांचे प्रमाणपत्र बोगस ठरले आहे. परिणामी या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढतच चालल्याचे स्पष्ट झालेले आहे.
कारवाई अटळ; शिक्षकांत खळबळ..
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी या प्रकरणात आतापर्यंत तिघांवर कारवाई केलेली आहे. माण तालुक्यातील सोकासन येथील जिल्हा परिषद शाळेतील वरिष्ठ मुख्याध्यापक विनायक पानसांडे, कऱ्हाड तालुक्यातील आगाशिवनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षिका सुरेखा प्रभाकर वायदंडे आणि माण तालुक्यातील काळेवाडी शाळेतील उपशिक्षक श्रीकांत विष्णू दोरगे यांना निलंबित केले आहे. आता २५ ते ३५ शिक्षकांवर कारवाई होणार असल्याने खळबळ उडाली आहे.