Satara: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणी ठार, दोघे जखमी; बहिणींना शाळेला सोडायला जाताना झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 18:46 IST2025-01-08T18:45:25+5:302025-01-08T18:46:47+5:30
लोणंद : आळंदी - पंढरपूर पालखी मार्गावर निरा मार्गावर पाडेगावजवळ खड्ड्यात गाडी आदळून झालेल्या अपघातात बारावीतील तरुणी ठार झाली ...

Satara: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणी ठार, दोघे जखमी; बहिणींना शाळेला सोडायला जाताना झाला अपघात
लोणंद : आळंदी - पंढरपूर पालखी मार्गावर निरा मार्गावर पाडेगावजवळ खड्ड्यात गाडी आदळून झालेल्या अपघातात बारावीतील तरुणी ठार झाली असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवार, दि. ६ रोजी सकाळी सातच्या सुमारास झाला. अंकिता अनिल धायगुडे असे अपघातात ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. विशाल धायगुडे, सानिका धायगुडे अशी जखमींची नावे आहेत.
बाळूपाटलाचीवाडी, ता. खंडाळा येथील विशाल दौलत धायगुडे (वय २५), बारावीत शिकणारी अंकिता अनिल धायगुडे (१७) व दहावीत शिकणारी सानिका विलास धायगुडे (१५) हे तिघे दुचाकी (एमएच ११ बीएफ ०६८३) वरून बाळूपाटलाचीवाडी येथून निरेकडे निघाले होते. विशाल धायगुडे हा जेजुरी येथे औद्योगिक वसाहतीत कामाला असल्याने दोन्ही चुलत बहिणींना शाळेसाठी निरेमध्ये सोडून तो पुढे जेजुरीला जाणार होता.
निरा मार्गावरील एका पेट्रोल पंपासमोर ते आले असता तेथे तेथे असलेल्या खड्ड्यात पाणी साठल्याने अंदाज आला नाही. या खड्ड्यात गाडी आदळल्याने दुचाकी या खड्ड्यात जोरदार आदळली. यामुळे तिघेही रस्त्यावर पडले. यामध्ये निरा येथील किलाचंद ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावी विज्ञान शाखेत शिकणारी अंकिता धायगुडे हिचा जागीच मृत्यू झाला, तर विशाल धायगुडे, सानिका धायगुडे हे गंभीर जखमी झाले. विशाल धायगुडे यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले. सानिका धायगुडे हिच्यावर लोणंद येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
ग्रामस्थांचा रास्ता रोको
संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करा, यासाठी पालखी महामार्ग बाळूपाटलाचीवाडी येथील ग्रामस्थांनी रोखून धरला. यामुळे एक तास संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. राजमाता अहिल्यादेवी चौकातच शेकडो नागरिक रस्त्यावर बसल्याने पुणे, सातारा व फलटणकडे जाणाऱ्या तिन्ही रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.