Satara: जन्मत:च 'तिच्या' हृदयाला छिद्र, वडिलांनी सहलीला जाऊ नको म्हणून सांगितलं, तरी हट्ट करून गेली, अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 12:39 IST2025-07-29T12:34:18+5:302025-07-29T12:39:23+5:30
हृदयाने कमजोर असतानाही गडावर पोहोचल्याचा आनंद झाला. तिने वडिलांना मोबाईलवर फोन केला

Satara: जन्मत:च 'तिच्या' हृदयाला छिद्र, वडिलांनी सहलीला जाऊ नको म्हणून सांगितलं, तरी हट्ट करून गेली, अन्..
सातारा : जन्मत:च तिच्या हृदयाला छिद्र. असे असतानाही ‘ती’ वर्गातील मैत्रिणींसोबत सहलीला सज्जनगडावर आली. सज्जनगडाच्या वाहनतळापासून तिने गड चढला. पूर्ण गड चढून ती सज्जनगडावर पोहोचली. तिला इतका आनंद झाला की तिने तत्काळ तिच्या वडिलांना फोन केला, ‘पप्पा, मी गड चढला.’ असं म्हणताच ती खाली कोसळली. तिला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारांदरम्यान तिची प्राणज्योत मावळली. ही हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सज्जनगडावर घडली.
श्रावणी राहुल लिंमकर (वय १६, रा. करमाळा रोड, करमाळा, सोलापूर) असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. श्रावणी ही दहावीत शिक्षण घेत होती. करमाळ्यात तिने एक खासगी क्लास लावला होता. या क्लासमधील मुला-मुलींची सहल रविवारी सज्जनगडावर आली होती. सहलीला येण्यापूर्वी तिच्या वडिलांनी तिला ‘तू जाऊ नकोस’, असं सांगितलं होतं. कारण तिच्या हृदयात लहानपणापासून छिद्र होतं. यामुळे तिला डाॅक्टरांनी खबरदारी घेण्याचे सांगितले होते. तिच्यावर उपचारही सुरू होते. असे असतानाही हट्ट करून ती सहलीला सज्जनगडावर आली.
सज्जनगडावरील वाहनतळावर सर्वजण वाहनातून उरतल्यानंतर हळूहळू चालत पायऱ्यांवरून सर्व मुले सज्जनगडावर निघाले. यात श्रावणीही चालत निघाली होती. पायऱ्या चढून गडावर पोहोचल्यानंतर तिला थोडी धाप लागली होती. परंतु, यापेक्षा तिला आपण हृदयाने कमजोर असतानाही गडावर पोहोचल्याचा आनंद झाला. तिने तिच्या वडिलांना मोबाईलवर फोन केला, ‘पप्पा बघा, तुम्ही म्हणत होता जाऊ नकाेस, पण मी गड चढला’, असं म्हणताच ती खाली कोसळली.
तिच्या शेजारी असलेल्या इतर मुलींनी तिला तातडीने आधार दिला. तिची शुद्ध हरपली होती. पायऱ्या उतरून तिला कसेबसे वाहनतळापर्यंत आणण्यात आले. यानंतर तातडीने तिला साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.
मैत्रिणी धायमोकलून रडल्या..
श्रावणी ही मितभाषी व अभ्यासात हुशार होती. तिच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे तिच्यासोबत असलेल्या वर्ग मैत्रिणींना मोठा मानसिक धक्का बसला. ‘ती’ या जगात नाही, हे समजताच तिच्या मैत्रिणी धायमोकलून रडू लागल्या. ‘तिनं तिच्या पप्पांचं ऐकलं पाहिजं होतं’, असं म्हणत मैत्रिणी रडत होत्या.