Satara Crime: ..अन् डोक्यात दगड घालून केला तरुणाचा खून, १२ तासांत गुन्हा उघड; दोघे ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 17:17 IST2023-02-11T17:17:32+5:302023-02-11T17:17:55+5:30
स्थानिक गुन्हे शाखेने दोघा आरोपींनी ताब्यात घेतले

Satara Crime: ..अन् डोक्यात दगड घालून केला तरुणाचा खून, १२ तासांत गुन्हा उघड; दोघे ताब्यात
सातारा : जुन्या भांडणाच्या कारणातून डोक्यात दगड घालून तरुणाचा खून करण्यात आला. हा प्रकार मेढा येथे घडला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोघा आरोपींनी ताब्यात घेतले आहे. तर मृत तरुणाचे नाव राम बाबू पवार (वय ३६, रा. गांधीनगर, मेढा) असे आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी सकाळच्या सुमारास मेढा येथील एका दुकानाच्या समोरील खड्ड्यात राम पवार याचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड आणि लाकडी फळीने मारहाण करून खून केल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर मेढा पोलिस ठाण्यात नोंद झाला होता.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक समीर शेख आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना गुन्हा उघडकीस आणण्याची सूचना केली होती. त्यामुळे सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार, रवींद्र भोरे, उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे यांच्यासह एक पथक घटनास्थळी गेले.
संशयितांची माहिती घेत असताना पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना मेढा येथीलच दोघांनी राम पवार याचा खून केला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या पथकाने मेढा शहरात शोध घेऊन दोघांना ताब्यात घेतले. अक्षय सोमनाथ साखरे (वय २२) आणि परमेश्वर गणपत पवार (२६, दोघेही रा. मेढा) अशी त्यांची नावे असल्याचे समोर आले. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी मेढा पोलिस पुढील तपास करीत आहेत.
१२ तासांत गुन्हा उघड...
मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर १२ तासांच्या आत तो उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. तर मृत राम पवार हा संशयितापैकी एकाच्या वडिलांना जुन्या भांडणाच्या कारणावरून त्रास देत होता. त्यामुळे त्याच्या डोक्यात दगड घालण्यात आला. यामध्येच राम पवार याचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.