Satara: पाच मिनिटांत येतो म्हणाला अन् अपघातात जीव गमावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 11:57 IST2024-01-16T11:56:21+5:302024-01-16T11:57:30+5:30

नेमका अपघात कसा झाला, की त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली, हे अद्याप समोर आले नाही.

A young man died in an accident near Bombay Restaurant in Satara | Satara: पाच मिनिटांत येतो म्हणाला अन् अपघातात जीव गमावला

Satara: पाच मिनिटांत येतो म्हणाला अन् अपघातात जीव गमावला

सातारा: येथील लक्ष्मी टेकडीतील नातेवाइकांकडे आलेल्या आदिनाथ प्रकाश भोरे (वय २७, सध्या रा. लक्ष्मी टेकडी, सदर बझार, सातारा. मूळ रा. शेटफळे, ता. आटपाडी, जि. सांगली) या तरुणाच्या दुचाकीला बाॅम्बे रेस्टाॅरंट परिसरात अपघात झाला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला असून, हा अपघात रविवारी सायंकाळी पाच वाजता झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आदिनाथ भोरे याची आत्या लक्ष्मी टेकडी परिसरात वास्तव्यास आहे. काही महिन्यांपूर्वी आदिनाथ हा आत्याकडे राहण्यासाठी आला होता. तो खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. रविवार, दि. १४ रोजी सायंकाळी पाच वाजता तो ॲक्टिव्हा गाडी घेऊन पाच मिनिटात येतो, असे सांगून घरातून निघून गेला. बाॅम्बे रेस्टाॅरंट परिसरातील सर्व्हिस रस्त्यावर त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. 

रुग्णवाहिकेने त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आदिनाथच्या दुचाकीचा नेमका कसा अपघात झाला, की त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली, हे अद्याप समोर आले नाही. या अपघाताची सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, हवालदार मेचकर हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: A young man died in an accident near Bombay Restaurant in Satara