Satara: भरधाव जीपच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 18:48 IST2025-03-10T18:46:26+5:302025-03-10T18:48:46+5:30
अपघातानंतर जीप चालकाची रस्त्याकडेला लावलेल्या पाच दुचाकींना धडक

Satara: भरधाव जीपच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
मुराद पटेल
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ-नायगाव रोडला सांगवी गावच्या हद्दीत भरधाव जीपच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. नौशाद मुस्तफा अन्सारी (वय ३८ ,सध्या रा.शिरवळ ता.खंडाळा मूळ रा.सिवान, राज्य-बिहार) असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर जीप चालकाने रस्त्याकडेच्या पाच दुचाकींना धडक दिली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, मृत नौशाद अन्सारी हा धनगरवाडी ता.खंडाळा येथील एका कंपनीमध्ये क्रेन ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. ते आपल्या दुचाकी क्रमांक (केएल-५८-एजी-८४०३)वरुन भाजी मंडईतून खरेदी करून चौपाळा येथील मशिदीमध्ये निघाले होते. दरम्यान, शिरवळ बाजूकडून भरधाव वेगाने आलेल्या जीप क्रमांक (एमएच-११-सीजी-०६७०) चालकाने नौशाद यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत ते जागीच ठार झाले. दरम्यान, जीपचालक महादेव कानडे याने रस्त्याच्या कडेला लावलेल्या पाच दुचाकींना धडक देत नुकसान केले.
शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी मोहम्मद अन्सारी याने शिरवळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस अंमलदार प्रशांत धुमाळ अधिक तपास करीत आहेत