डॅश देतो का, म्हणत साताऱ्यात रिक्षा चालकावर शस्त्राने वार, तिघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 13:45 IST2025-08-07T13:44:15+5:302025-08-07T13:45:57+5:30
पत्नी आणि वहिनी या भांडणे सोडविण्यासाठी आल्या असता, त्यांनाही संशयित आरोपींनी मारहाण करून शिवीगाळ केली

डॅश देतो का, म्हणत साताऱ्यात रिक्षा चालकावर शस्त्राने वार, तिघांवर गुन्हा दाखल
सातारा: ‘डॅश देतोस का,’ असे म्हणत संदीप बबन जाधव (वय ४५, रा.कोडोली, सातारा) या रिक्षा चालकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. ही घटना मंगळवार, दि. ५ रोजी सकाळी कोडोलीतील साई सम्राट ढाब्यासमोर घडली. या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
ऋषिकेश शशिकांत पवार (रा.कोडोली, सातारा) याच्यासह त्याच्या दोन अनोळखी मित्रांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. रिक्षा चालक संदीप जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रिक्षा घेऊन जात असताना संबंधित आरोपींनी मोटारसायकल आडवी मारून रिक्षाचा डॅश देतोस का, असे विचारले. यावरून, तसेच जुन्या कारणावरून रिक्षातून बाहेर ओढून हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कपाळावर कोणत्या तरी धारदार शस्त्राने वार करून जखमी केले.
पत्नी आणि वहिनी या भांडणे सोडविण्यासाठी आल्या असता, त्यांनाही संशयित आरोपींनी हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. संशयित आरोपीने खिशातून जबरदस्तीने ८०० रुपये काढून घेतले, तसेच रिक्षाच्या काचेचे ४,००० रुपयांचे नुकसान केले, असेही रिक्षा चालक जाधव यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.