चोरीचा नवा फंडा! नजर चुकवून घरात घुसायचा अन् चोरायचा लॅपटाॅप, आरोपी अटकेत

By दत्ता यादव | Published: February 26, 2024 10:50 PM2024-02-26T22:50:42+5:302024-02-26T22:50:58+5:30

दत्तात्रय उर्फ योगेश नंदकुमार खवळे (वय २३) असे आरोपीचे नाव

A new fund of theft! The accused used to sneak into the house and steal the laptop, arrested | चोरीचा नवा फंडा! नजर चुकवून घरात घुसायचा अन् चोरायचा लॅपटाॅप, आरोपी अटकेत

चोरीचा नवा फंडा! नजर चुकवून घरात घुसायचा अन् चोरायचा लॅपटाॅप, आरोपी अटकेत

दत्ता यादव, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: अलीकडे चोरीचे वेगवेगळे फंडे समोर येत असून, एक चोरटा दिवसाढवळ्या नजर चुकवून घरात शिरून चोरी करत होता. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर हा चोरीचा नवा फंडा समोर आला. सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने त्याच्याकडून चोरीचा लॅपटाॅप, तीन मोबाइलसह स्पोर्ट बाइक हस्तगत केली.

दत्तात्रय उर्फ योगेश नंदकुमार खवळे (वय २३, रा. कोडोली, सातारा), असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील गोडोली आणि औद्योगिक वसाहतीमधील एका प्रशिक्षण केंद्रातून भरदिवसा एका चोरट्याने लोकांची नजर चुकवून मोबाइल आणि लॅपटाॅप चोरून नेला होता. या प्रकरणाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी करत होते. तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना चोरट्याचा सुगावा लागला. त्या अनुषंगाने सलग तीन दिवस पोलिसांच्या पथकाने ठिकठिकाणी चाैकशी केली. त्यावेळी संशयित खवळे हा किती वाजता जातो, येतो याची माहिती पोलिसांनी मिळवली. त्यानुसार पथकाने पाळत ठेवून खवळे याला रविवारी रात्री साडेदहा वाजता दत्तनगर, कोडोली येथे अटक केली. त्याने चाेरीची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून पोलिसांनी एक लॅपटाॅप, तीन मोबाइल, स्पोर्ट बाइक, असा सुमारे १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अशाच पद्धतीने त्याने शहरात इतर ठिकाणीही चोरी केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. या अनुषंगाने त्याच्याकडे पोलिस कसून चाैकशी करत आहेत.

पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक ऑंचल दलाल, उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने, पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार सुजित भोसले, नीलेश जाधव, पंकज मोहिते, विक्रम माने, इरफान मुलाणी, सागर गायकवाड आदींनी ही कारवाई केली.

महिनाभरापूर्वीच्या चोरीचा छडा लागणार..

भर दिवस घरातून कोणाच्या वस्तू चोरीस गेल्या असतील तर सातारा शहर पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. महिनाभरापूर्वी सातारा शहरात अशाच प्रकारे अनेकांचे मोबाइल आणि लॅपटाॅप चोरीस गेले आहेत. या चोरीचाही उलगडा होण्याची शक्यता आहे. 

Web Title: A new fund of theft! The accused used to sneak into the house and steal the laptop, arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.