महिनाभरात मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे सूचक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 15:51 IST2025-12-01T15:49:40+5:302025-12-01T15:51:35+5:30
निवडणूक आयोगाच्या सावळ्या गोंधळाला सरकार जबाबदार

महिनाभरात मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे सूचक वक्तव्य
कराड : एपस्टाईन फाईल्स वरून अमेरिकेत गेल्या ६ महिन्यांपासून मोठा गदारोळ सुरू आहे. ती फाईल उघड झाल्यावर भारताच्या राजकारणावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. कदाचित महिनाभरात मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो असे सूचक वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.
कराड येथे आज, सोमवारी निवासस्थानी पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी अजितराव पाटील - चिखलीकर, कराड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अँड अमित जाधव आदी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, खरे तर हा विषय आंतरराष्ट्रीय आहे. अमेरिकेतील एका उद्योगपतीने अनेक बेकायदेशीर गोष्टी करत अनेक राजकीय लोकांना त्यात गुंतवले आहे. त्यामध्ये अनेक देशातील मोठ्या लोकांची नावे आहेत. त्यामध्ये आपल्या देशातील कोणाची नावे आहेत का हे पहावे लागेल असेही एका प्रश्नावर चव्हाण म्हणाले.
सुमारे १० हजार पानांची ती फाईल अमेरिकेच्या संसदेने ताब्यात घेतली आहे. ती फाईल खुली करावी यासाठी ट्रम्प यांच्यावरती दबाव वाढत आहे. ती फाईल प्रकाशित झाली तर बरंच काही समोर येईल.
दरम्यान ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक व्हिडिओ केला आहे. त्या व्हिडिओमध्ये देखील ती कागदपत्रे लवकरच मला मिळतील असे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये उलतापालथी होण्याची शक्यता आहे असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.
तयारी नव्हती तर निवडणूक घेण्याची गडबड कशासाठी?
निवडणूक आयोगाने सगळा गोंधळ घालून ठेवला आहे. तयारी नव्हती तर त्यांनी निवडणूक घेण्याची गडबड कशासाठी केली? असा सवाल त्यांनी केला. त्याचबरोबर आता ऐनवेळी देखील काही निवडणुका पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत. हा सगळा पोरखेळ करून टाकला आहे. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. या सगळ्या गोंधळाला राज्य सरकार जबाबदार असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली.
आचार संहिता कोठे आहे?
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पालिका निवडणुक प्रचार सभेत जाहीरपणे प्रलोभन देणारी वक्तव्ये करीत आहेत.हे आचार संहितेत बसते का? याबाबत छेडले असत आचारसंहिता कोठे आहे? असा प्रश्न करीत निवडणूक आयोग सरकारच्या हातचे बाहुले बनले असल्याची टिका चव्हाण यांनी केली.
ते तुम्ही शोधा?
तुम्ही मराठी माणूस पंतप्रधान बनू शकतो असे म्हटले आहे. याबाबत ट्विट करताना तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टॅग केले आहे. नेमका कोण मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो याबाबत छेडले असता ते आता तुम्ही शोधा असे चव्हाण यांनी मिश्कीलपणे सांगितले.