Satara News: कालेत बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला, प्रसंगावधान राखत रक्तबंबाळ अवस्थेत दुचाकी तशीच पुढे नेली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 14:03 IST2025-12-27T14:02:13+5:302025-12-27T14:03:19+5:30
रात्रीच्या सुमारास घडली घटना : परिसरात दहशतीचे वातावरण

Satara News: कालेत बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला, प्रसंगावधान राखत रक्तबंबाळ अवस्थेत दुचाकी तशीच पुढे नेली
कराड : काले (ता. कराड) परिसरात बिबट्यांची संख्या लक्षणीय आहे. परंतु आजअखेर कधीही बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली नव्हती. मात्र, काले गावातील प्रगतिशील शेतकरी संतोष पाटील यांच्यावर संजयनगरकडे जात असताना गुंडगेचा मळा नावाच्या शिवारात बिबट्याने हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. बिबट्याच्या हल्ल्यात पाटील यांच्या मानेवर दुखापत झाली असून, ते थोडक्यात बचावले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, काले (ता. कराड) येथून गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास प्रगतिशील शेतकरी संतोष पाटील दुचाकीवरून संजयनगरकडे निघाले होते. ते रत्यावरून जात असताना त्यांच्या गाडीवर उसाच्या शेतातून बाहेर आलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. बिबट्याने मारलेला पंजा पाटील यांच्या मानेवर लागला आणि त्यांच्या मानेवर नखाची जखम झाली.
रक्तबंबाळ झालेले शेतकरी संतोष पाटील यांनी प्रसंगावधान राखत दुचाकी तशीच पुढे नेली. पुढे प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचल्यानंतर त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, रात्रीच्यावेळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे काले परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी..
बिबट्याने ज्या रस्त्यावर हल्ला केला, त्या रस्त्यावरून संजयनगर येथील राहणारी लहान मुले शिक्षणासाठी काले गावात पायी चालत ये-जा करतात. तसेच शेतकरीवर्गही त्या रस्त्याने शेतीच्या कामानिमित्त शेत शिवारात जात असतात. बिबट्याने केलेल्या हल्ल्यानंतर बिबट्याचा तत्काळ वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.