Satara: सोने खरेदीच्या बहाण्याने कराडमध्ये बोलावले, बेळगावच्या सराफाला मारहाण करुन ३५ लाखांना लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 13:50 IST2025-10-28T13:50:32+5:302025-10-28T13:50:59+5:30
तिघांवर गुन्हा, दोघे ताब्यात, एक फरार

Satara: सोने खरेदीच्या बहाण्याने कराडमध्ये बोलावले, बेळगावच्या सराफाला मारहाण करुन ३५ लाखांना लुटले
कराड : बेळगावच्या सराफाला सोने खरेदीच्या बहाण्याने कराडमध्ये बोलावून त्याच्याकडील तब्बल ३५ लाख रुपये लुटले. शहरातील मंगळवारपेठेत असलेल्या एका पडक्या वाड्यात १३ ऑगस्ट रोजी दुपारी घडलेली ही घटना रविवारी उघडकीस आली. या प्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करून दोन जणांना अटक करण्यात आले आहे.
याबाबतची फिर्याद प्रवीण प्रभाकर आनवेकर (वय ४७) रा.कीर्तनकार अपार्टमेंट, भोजन गल्ली, शहापूर, जि.बेळगाव, कर्नाटक यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी मुरलीधर उर्फ अनिकेत शेवाळे (रा.कराड) याच्यासह अन्य एकाला पोलिसांनी अटक केली आहे, तर एक जण पसार झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात शहापूर येथे राहणारे प्रवीण आनवेकर हे सराफा व्यावसायिक आहेत. साईराज नामक एक युवकही त्याच परिसरात वास्तव्यास होता. साईराज याची प्रवीण आनवेकर यांच्याशी ओळख होती. काही महिन्यांपूर्वी साईराज याने कराडातील मुरलीधर उर्फ अनिकेत शेवाळे याच्याकडे सोने असून, तो कमी पैशात सोने विकत असल्याचे प्रवीण आनवेकर यांना सांगितले.
साईराज याच्या सांगण्यावर विश्वास ठेवून आनवेकर यांनी मुरलीधर उर्फ अनिकेत शेवाळे याच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्याने ३५ लाख रुपयांत अर्धा किलो सोने देतो, असे सांगितले. व्यवहार ठरल्यानंतर प्रवीण आनवेकर हे ३५ लाख रुपये घेऊन १३ ऑगस्ट २५ रोजी दुपारी कराडात आले.
त्यानंतर, संशयित त्यांना घेऊन शहरातील मंगळवारपेठेत असलेल्या निरंजन कुलकर्णी यांच्या पडक्या वाड्यात गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर संशयितांनी प्रवीण आनवेकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत, त्यांच्याकडील ३५ लाख रुपये असलेली बॅग हिसकावून तेथून पोबारा केला.