Satara: कऱ्हाडात बनावट सोन्याची बिस्किटे देऊन ५० लाखांच्या फसवणुकीचा डाव उधळला, तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 12:58 IST2025-07-31T12:58:09+5:302025-07-31T12:58:38+5:30

सोनाराची सतर्कता अन् कऱ्हाड पोलिसांची कारवाई

A fraud scheme of Rs 50 lakhs was foiled by giving fake gold biscuits in Karad. | Satara: कऱ्हाडात बनावट सोन्याची बिस्किटे देऊन ५० लाखांच्या फसवणुकीचा डाव उधळला, तिघांना अटक

Satara: कऱ्हाडात बनावट सोन्याची बिस्किटे देऊन ५० लाखांच्या फसवणुकीचा डाव उधळला, तिघांना अटक

कऱ्हाड : कऱ्हाड येथे सोन्याची बनावट बिस्किटे देऊन त्या बदल्यात पैसे हडपण्याचा प्रकार सोनाराने दाखवलेली सतर्कता व पोलिसांच्या तत्काळ हस्तक्षेपामुळे उघड झाला. त्यामुळे पोलिसांना तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले. हे तिघे बनावट सोन्याची बिस्किटे विक्रीस आणून तब्बल ५० लाखांची फसवणूक करण्याच्या तयारीत होते.

गोविंद एकनाथराव पदातुरे (रा. अहमदपूर, जि. लातूर), सर्जेराव आनंदा कदम (रा. पिसाद्री, कोल्हापूर) व अधिक आकाराम गुरव (रा. म्हासुर्णे, खटाव) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मुजावर कॉलनीतील आसिफ अकबर मुल्ला यांचे ज्वेलर्सचे दुकान आहे. मंगळवारी रात्री ७:३० च्या सुमारास एकजण दुकानात दाखल झाला. त्या व्यक्तीने त्याचे नाव गोविंद पदातुरे असल्याचे सांगून, माझ्याकडे चोवीस कॅरेटचे ५०० ग्रॅम शुद्ध सोने असून, ते मला विकायचे आहे, असे सांगितले. गोविंद पदातुरे याने त्याच्याकडे असलेल्या बिस्किटांपैकी एक बिस्कीट पांढऱ्या प्लास्टिक पिशवीतून काढून आसिफ मुल्ला यांना दाखवले.

हे बिस्कीट पाहताक्षणीच खरे वाटल्याने मुल्ला यांना संशय आला. त्याच वेळी गोविंद याने आपल्या मित्राच्या घरी गजानन हौसिंग सोसायटी येथे व्यवहार करू, असे सुचवले. असिफ मुल्ला यांना संशय आल्यामुळे त्यांनी गोविंद याची नजर चुकवून कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यास याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने याची दखल घेत उपनिरीक्षक सांडगे यांना कारवाईसाठी पाठवले.

असिफ मुल्ला हे गोविंदसोबत दुचाकीवरून गजानन हौसिंग सोसायटी येथे गेले. त्या ठिकाणी सर्जेराव कदम व अधिक गुरव हे दोघे उपस्थित होते. तिघांनी मिळून बनावट सोन्याच्या १० बिस्किटांचा व्यवहार सुमारे ५० लाखांना रोख रकमेत करण्याची बोलणी सुरू केली.

याचवेळी पोलिस निरीक्षक नीलेश तारू, उपनिरीक्षक निखिल मगदुम व सहकाऱ्यांनी छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. तिघांची झडती घेतली तेव्हा त्यांच्या खिशात बनावट सोन्याची ११ बिस्किटे सापडली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून, फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: A fraud scheme of Rs 50 lakhs was foiled by giving fake gold biscuits in Karad.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.