सफाई कामगार बनला फसवणुकीत ‘सफाईदार’!, साताऱ्यातील बोलघेवड्या पप्पूचे कारनामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 16:28 IST2025-02-14T16:26:13+5:302025-02-14T16:28:25+5:30

फसविण्यासाठी मंत्रालयाचे नाव..

A cleaning worker in Satara District Government Hospital cheated many people | सफाई कामगार बनला फसवणुकीत ‘सफाईदार’!, साताऱ्यातील बोलघेवड्या पप्पूचे कारनामे

सफाई कामगार बनला फसवणुकीत ‘सफाईदार’!, साताऱ्यातील बोलघेवड्या पप्पूचे कारनामे

सातारा : त्याचा स्वभाव बोलघेवडा. ना ओळख ना पाळख. तरीही गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपली कशी ओळख आहे, याच्या फुशारक्या मारण्याच्या स्वभावामुळे अनेकजण त्याच्या गळाला लागले. स्वत:च्या करिअरचा ठावठिकाणा नसताना दुसऱ्यांना शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यानं अनेकांना गंडा घातला. एकदा कारागृहात जाऊन आल्यानंतर यात तो माहीर झाला. आता दुसऱ्यांदा तो कारागृहात गेलाय.

सातारा तालुक्यातील महामार्गाला लागून बोरगाव हे गाव. या गावामध्ये ३५ वर्षांचा विवाहित तरुण राजेश ऊर्फ पप्पू नंदकुमार शिंदे हा राहतो. काही वर्षांपूर्वी हा पप्पू जिल्हा शासकीय रुग्णालयात सफाई कामगार म्हणून काम करत होता. पुढे हाच कामगार फसवणुकीत अगदी सफाईदार बनला. स्वभाव त्याचा बोलघेवडा असल्यामुळे त्याची चटकन कोणाशीही ओळख व्हायची. त्यातून नर्स, डाॅक्टरांचाही त्याचा चांगला संपर्क असायचा; मात्र त्याचे सिव्हिलमधील काम सुटल्यानंतर तो मोकाट सुटला. हाताला कामधंदा नसताना त्याने लोकांना गंडा घालण्याचा कामधंदा सुरू केला. मंत्रालयात माझी चांगली ओळख आहे. आरोग्य विभागात नोकरी लावू शकतो, असे त्याने अनेकांना सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून काही जणांनी त्याला लाखो रुपये दिले. 

लोक पैसे देताहेत, हे त्याला समजल्यानंतर त्याने अशाप्रकारचे लोक शोधण्यास सुरुवात केली. एका व्यक्तीने त्याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर त्याचा कारनामा पहिल्यांदा समोर आला. काही वर्षांपूर्वी त्याला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक झाली होती; परंतु काही दिवसांतच तो जामिनावर सुटून बाहेर आला; मात्र पुन्हा त्याने हाच उद्योग सुरू ठेवला. एका महिला नर्सला त्याने लाखो रुपयांना गंडा घातल्यानंतर त्याच्यावर पुन्हा एकदा सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला सध्या अटक केली आहे. त्याने कोणाकोणाला गंडा घातलाय, याची त्याच्याकडून पोलिस माहिती घेताहेत; पण नागरिकांनीही स्वत:हून पुढे येऊन फसवणूक झाली असेल तर तक्रार देणे गरजेचे आहे, असे पोलिस सांगताहेत.

फसविण्यासाठी मंत्रालयाचे नाव..

मंत्रालयात पप्पू शिंदेची कुठेही ओळख नाही. केवळ लोकांना फसविण्यासाठी त्याने मंत्रालयाचे नाव सांगितले. जे लोक त्याला पैसे परत मागायचे. त्यांचे पैसे थोडे-थोडे करून तो परत द्यायचा. लोकांची आक्रमकता पाहून तो वागायचा. त्यानंतर दुसरे गिऱ्हाईक शोधायचा.

Web Title: A cleaning worker in Satara District Government Hospital cheated many people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.