दारू दुकानात चिमुकलीला सोबत नेलं, बापाला बदडले; साताऱ्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 15:55 IST2025-09-11T15:54:55+5:302025-09-11T15:55:22+5:30
फ्रॅक्चर झाल्याने रुग्णालयात दाखल

दारू दुकानात चिमुकलीला सोबत नेलं, बापाला बदडले; साताऱ्यातील घटना
सातारा : नऊ वर्षांच्या बालिकेला सोबत दारू पिण्यासाठी देशी दारूच्या दुकानात आल्याने बापाला लाकडी दांडक्याने बदडण्यात आले. ही अजब घटना मंगळवारी (दि. ९) सकाळी नऊच्या सुमारास साताऱ्यातील एका देशी दारूच्या दुकानात घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एका नऊ वर्षांच्या बालिकेचे ४५ वर्षींचे वडील साताऱ्यातील भाजी मंडईमध्ये हमालीचे काम करतात. दि. ९ रोजी सकाळी ते त्यांच्या मुलीला सोबत घेऊन देशी दारूच्या दुकानात दारू पिण्यासाठी गेले. त्यावेळी तेथे बाळा नावाची व्यक्ती होती. त्या व्यक्तीने ‘तू मुलीला का घेऊन आला,’ असे विचारले. यावरून दोघांत शाब्दिक चकमक झाली.
वाद वाढत गेल्याने मुलीच्या बापाला लाकडी दांडक्याने कमरेवर, उजव्या पायाच्या नडगीवर मारून संबंधित व्यक्तीने फ्रॅक्चर केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलीच्या वडिलांना जिल्हा शासकीय रुग्णालयात काहींनी दाखल केले.
तिच्या मनावर काय परिणाम होईल
वडिलांना मारहाण होत असल्याचे पाहून संबंधित बालिका ओरडू लागली. वडिलांना कशासाठी मारहाण होत आहे. हे तिला समजले नाही. ती रडतच मारू नका, अशी गयावया करीत होती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, या घटनेचे काही लोकांनी समर्थनही केले. एवढ्या लहान मुलीला दारू दुकानात घेऊन आल्यामुळे तिच्या मनावर काय परिणाम होईल, हे बापाला कसे कळले नाही, असेही काही लोक म्हणत होते.