दुकानासमोर लिंबू, काळी बाहुली!; ‘अंनिस’च्या साताऱ्यातच दैवी दहशत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 19:19 IST2025-07-12T19:18:33+5:302025-07-12T19:19:24+5:30
पोलिसांची तक्रार नोंदविण्यासाठी टाळाटाळ..

दुकानासमोर लिंबू, काळी बाहुली!; ‘अंनिस’च्या साताऱ्यातच दैवी दहशत
सातारा : साताऱ्यातील डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांनी संपूर्ण आयुष्य अंधश्रध्दा निर्मूलनासाठी घालवले. तसेच अंधश्रध्दा निर्मूलन समितीची चळवळ साताऱ्यात सुरू करुन महाराष्ट्रात पसरवली. अशा या साताऱ्यात गुरूपाैर्णिमेदिवशी रात्री एका दुकानासमोर रांगोळी घालून त्यावर टाचण्या लावलेली लिंबे, काळी बाहुली आणि गुलाल टाकल्याचे दिसून आले. दैवी दहशत पसरविण्याचाच हा प्रकार होता. पण, ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी तेथील साहित्य काढून दुकानादाराची भीती दूर केली.
सातारा शहरातील राधिका रस्त्यावर प्रतापसिंह शेती फार्मच्या समोर एक छोटे कापडाचे दुकान आहे. रहदारीच्या या रस्त्यावर पौर्णिमेच्या दिवशी रात्री या छोट्या दुकानासमोर रांगोळी घालून त्यावर टाचण्या लावलेली लिंबे आणि काळी बाहुली ठेवून गुलाल टाकल्याचा प्रकार घडल्याचे दिसून आले. गुरूपौर्णिमेच्या रात्री कोणीतरी हे साहित्य ठेवले होते. हे पाहिल्यानंतर दुकान मालकाने सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उदय चव्हाण यांना माहिती दिली.
त्यानंतर उदय चव्हाण, डॉ. दीपक माने, भालचंद्र गोताड या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. संबंधित दुकान मालकाच्या मनामध्ये भीती बसलेली होती. पण, कार्यकर्त्यांनी समजावून सांगत त्यांच्या मनातील भीती काढून टाकली. तसेच तेथील साहित्य हाताने उचलून बाजूला टाकले. गुलाल रांगोळी झाडून टाकली. तसेच दैवी दहशतही झुगारली.
दरम्यान, आपल्या आजूबाजूला अशा प्रकारच्या गोष्टी दिसल्यास लोकांनी न घाबरता अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे संपर्क साधावा, असे आवाहन ‘अंनिस’चे पदाधिकारी डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले आहे.
पोलिसांची तक्रार नोंदविण्यासाठी टाळाटाळ..
दुकानमालक महिला झालेल्या प्रकाराची माहिती आणि तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनला गेली होती. तेव्हा तक्रार नोंद करून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगूनही हा प्रकार आमच्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडला नाही. तुम्ही दुसरीकडे जा अशाप्रकारे उत्तरे देण्यात आली. खरंतर जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक पोलिस स्टेशनला स्वतंत्र कक्ष असणे गरजेचे आहे. त्यामुळे अशी मागणीही समितीच्यावतीने करण्यात आली आहे.
सातारा शहरात अंधश्रध्दा पसरविण्याचा प्रकार घडला. कोणीतरी एका दुकानासमोर टाचणी टोचलेले लिंबे, काळी बाहुली ठेवली होती. यातून दैवी दहशत पसरविण्याचा आणि भीती घालण्याचा प्रकार झाला. पण, ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी हे सर्व काढून टाकून लोकांच्या मनातील भीतीही दूर केली आहे. असे प्रकार अंधश्रध्देतून होत असतात. - उदय चव्हाण, कार्यकर्ता, ‘अंनिस’