Satara: काळ्या बाजारात धान्यविक्री रेशन दुकानदारावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 14:05 IST2025-02-18T14:05:21+5:302025-02-18T14:05:44+5:30

गाडी चालकाचा पोबारा

A case has been registered against a ration shopkeeper in Khanapur of Satara district for selling grains in the black market | Satara: काळ्या बाजारात धान्यविक्री रेशन दुकानदारावर गुन्हा

संग्रहित छाया

सातारा : खानापूर, ता. वाई येथील रेशन दुकानदाराने लाभार्थ्यांच्या हक्काचे १ लाख ४१ हजारांचे धान्य काळ्या बाजारात विकल्याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राजेंद्र सुभेदार जाधव (वय ५२, रा. खानापूर) असे त्याचे नाव आहे.

याप्रकरणी वाई तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार समीर बेग महम्मद बेग मिर्झा यांनी वाई पोलिसांत फिर्याद दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, दि. १६ रोजी सव्वा एक वाजेच्या सुमारास खानापूर गावच्या हद्दीत स्वस्त धान्य दुकानदार राजेंद्र सुभेदार जाधव यांच्याकडून रेशन धान्याचा अपहार करत असल्याची माहिती बेग यांना मिळाली. यामुळे त्यांनी दुकानावर जाऊन स्टाॅक रजिस्टर तपासले. यावेळी रजिस्टरमधील नोंदीप्रमाणे रेशनिंग दुकानदाराकडे दि. १६ पर्यंत एकूण गहू १०४५ किलो शिल्लक असणे गरजेचे होते; परंतु ३९५ किलो गहू कमी आढळून आला, तसेच एकूण ७१४ किलो वजनाचे तांदूळ शिल्लक आवश्यक असताना ३२८ किलो तांदूळ जास्तीचे दिसून आले. नोंदीनुसार २ किलो साखरही शिल्लक नव्हती.

तसेच जाधव यांच्या दुकानाशेजारील घरात अंदाजे ५० किलोची ५० पोती गव्हाची व ५० किलोची ५ तांदळाची पोती जास्तीची मिळून आली. दुकानाशेजारील बोळामध्ये २५ किलो तांदूळ व १५ किलो गहू शासकीय बारदानात मिळून आले. राजेंद्र जाधव यांच्या रास्त भाव दुकानात अनियमितता दिसल्याने समीर बेग यांनी १ लाख ४१ हजार २२० रुपयांच्या धान्याच्या अपहारप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी राजेंद्र जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक बिपीन चव्हाण तपास करत आहेत.

दरम्यान, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी भारतकुमार तुंबडे यांनीही गतवर्षी वर्णे, ता. सातारा येथील विकास सोसायटीच्या रेशन दुकानाचे रजिस्टर तपासणी करून २ लाख ७३ हजार ४०० रुपयांच्या धान्याचा अपहार केल्याप्रकरणी फिर्याद दिली होती.

गाडी चालकाचा दिसताच पोबारा

नायब तहसीलदार समीर बेग मिर्झा यांनी मिळालेल्या माहितीनंतर वाई पोलिस कर्मचारी, पोलिस पाटील दुकानाजवळ गेले. यावेळी तेथे पिकअप गाडी उभी होती. सर्व शासकीय कर्मचारी व पोलिस येत असल्याची चाहूल लागल्याने गाडीचा चालक व सोबतचे दोन लोक तेथून पळून गेले.

Web Title: A case has been registered against a ration shopkeeper in Khanapur of Satara district for selling grains in the black market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.