99th Marathi Sahitya Sammelan: नवोदित लेखक स्वतःच्या अनुभवातूनच घडतो - तारा भवाळकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 19:11 IST2026-01-02T19:10:34+5:302026-01-02T19:11:59+5:30
या ऐतिहासिक भूमीत साहित्य संमेलन होत असल्याचा मला सार्थ अभिमान

99th Marathi Sahitya Sammelan: नवोदित लेखक स्वतःच्या अनुभवातूनच घडतो - तारा भवाळकर
सातारा : ‘साहित्य क्षेत्रात येणाऱ्या नवीन कवी आणि लेखकांना संदेश देणे मला योग्य वाटत नाही. कारण, जो-तो आपल्या अवती-भोवतीच्या अनुभवातून अनेक गोष्टी शिकत असतो आणि त्यातूनच आपला मार्ग शोधत असतो,’ अशा मोजक्या पण अत्यंत अर्थपूर्ण शब्दांत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी नवोदितांना प्रोत्साहित केले. अनुभवांची ही शिदोरीच लेखकाला समृद्ध करते, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
साताऱ्यातील स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज थोरले साहित्यनगरीत (शाहू क्रीडा संकुल) गुरुवारपासून ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शंखनाद झाला. ध्वजारोहण आणि ग्रंथदालनाच्या उद्घाटनाने या सोहळ्याची सुरुवात झाली.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना डॉ. भवाळकर भावुक झाल्या. त्या म्हणाल्या, ‘सातारा ही छत्रपतींची राजधानी असून दक्षिण महाराष्ट्रातील एक प्रमुख केंद्र आहे. मी सांगलीत राहत असले, तरी सातारा आणि सांगली ही दोन शहरे माझ्यासाठी अंगण-वस्तीसारखी आहेत. या ऐतिहासिक भूमीत साहित्य संमेलन होत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे, असे सांगत साताऱ्याच्या साहित्य पर्वाला डॉ. भवाळकर यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.
संमेनलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, कार्यवाह सुनीता राजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, मावळा फाउंडेशनचे शरद बेबले, नगराध्यक्ष अमोल मोहिते यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
साताऱ्याशी ऋणानुबंधाचे नाते...
आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना डॉ. भवाळकर म्हणाल्या, ‘सातारा आणि माझे नाते केवळ भौगोलिक नसून, ते वैचारिक आहे. ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंखे यांच्यापासून ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांचा सहवास मला या मातीत लाभला. आजही साताऱ्यातील अनेक मित्रमंडळी माझ्या संपर्कात आहेत.
आठवणींचा सेल्फी
ग्रंथदालनाच्या उद्घाटनानंतर डॉ. तारा भवाळकर यांनी विविध स्टॉल्सला भेट देऊन ग्रंथांची पाहणी केली. संमेलनामुळे नवीन कवी आणि लेखकांना एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. अनेक साहित्य रसिकांनी डॉ. भवाळकर यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्यासोबत फोटो काढून ही संस्मरणीय भेट आपल्या कॅमेऱ्यात कैद केली.