Satara ZP Election 2026: भाजपने खाते खोलले; माणमध्ये एक उमेदवार बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 19:29 IST2026-01-28T19:27:39+5:302026-01-28T19:29:04+5:30

जिल्ह्यातील चित्र स्पष्ट : पाटणचा ‘सामना’ होणार निर्णायक...

A BJP candidate was elected unopposed in Maan in the Satara Zilla Parishad elections | Satara ZP Election 2026: भाजपने खाते खोलले; माणमध्ये एक उमेदवार बिनविरोध

संग्रहित छाया

सातारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत संपल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय चित्र स्पष्ट झाले असून, महायुती अंतर्गतच ही लढाई होणार आहे. त्यामुळे आता निवडणुकीचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. तर, भाजपने माण तालुक्यात बिनविरोधने खाते खाेलले आहे. आंधळी गणातून अर्जून काळे बिनविरोध निवडून आले आहेत. तर, जिल्हा परिषदेच्या ६५ गट आणि पंचायत समितीच्या १३० गणांसाठीची ही निवडणूक आहे.

सातारा जिल्हा परिषद आणि ११ तालुक्यातील पंचायत समितीची निवडणूक तब्बल नऊ वर्षांनी होत आहे. या संस्थांवर मागील पावणे चार वर्षांपासून प्रशासक राजवट आहे. पण, आता जिल्हा परिषदेच्या ६५ गट आणि पंचायत समितींच्या १३० गणांसाठी निवडणूक जाहीर झाली. यासाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत २७ जानेवारी होती. अर्ज माघार घेण्यादरम्यान अनेक तालुक्यात राजकीय घडामोडी घडल्या. त्यामुळे अनेकांनी अर्ज माघार घेतले. यामध्ये माण तालुक्यातील आंधळी गणात भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.

जिल्ह्यातील निवडणूक ही प्रामुख्याने भाजपविरोधातच होणार आहे. अनेक ठिकाणी भाजपच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली आहे. तसेच शिंदेसेनेनेही भाजपविरोधात दंड थोपटलेत. उद्धवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, काॅंग्रेसही काही ठिकाणी लढत देत आहे. तरीही जिल्ह्यातील ही निवडणूक महायुती अंतर्गतच रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कराड तालुक्यात जिल्हा परिषदेचे सर्वाधिक १२ गट असून, गणांची संख्या २४ आहे. कराडला भाजपच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात. काही ठिकाणी शिंदेसेनेने तसेच राष्ट्रीय काॅंग्रेसनेही उमेदवार उभे केले आहेत. सातारा तालुक्यात भाजपविरोधात इतर पक्ष रिंगणात आहेत. फलटणला जवळपास सर्वच ठिकाणी तिरंगी लढत अपेक्षित आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस एकत्र आली असली तरी विरोधात शिंदेसेना दंड थोपटून तयार आहे तसेच वंचित, रासप, बसपाचेही उमेदवार लढत आहेत.

पाटणचा ‘सामना’ होणार निर्णायक...

१. पाटण तालुक्यात शिंदेसेना आणि भाजपमध्येच खरा सामना आहे. कोरेगाव तालुक्यात दोन गटात दुरंगी तर चार ठिकाणी चाैरंगी लढत होणार आहे. भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी, काॅंग्रेस, उद्धवसेना निवडणुकीत आहे. खटाव तालुक्यात भाजप, राष्ट्रवादी, शिंदेसेना, काॅंग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना रिंगणात आहे.
२. खंडाळा तालुक्यात भाजपविरोधात राष्ट्रवादी काॅंग्रेस अशी प्रमुख लढत होणार आहे. येथे दुरंगीच सामना होईल. वाई तालुक्यातही भाजपच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेल्या आहेत. यामुळे वाईत निकराची लढाई अपेक्षित आहे.

महाबळेश्वर, जावळी, माणमध्ये अटीतटीची लढत...

महाबळेश्वर तालुक्यात महायुती अंतर्गतच खरी लढत आहे. भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदेसेनाही मैदानात उतरली आहे. जावळी तालुक्यात भाजपच्या विरोधात शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र आलेत. काही ठिकाणी अपक्षही रिंगणात आहेत. त्यामुळे जावळीतील निवडणूक ही अटीतटीची होण्याचा अंदाज आहे. माण तालुक्यात भाजपविरोधात राष्ट्रवादी आणि रासप एकत्र आलेत. माणमधील काही गट आणि गणांत कांटे की टक्कर आहे. यामध्ये मार्डी, कुकुडवाड गटाचा समावेश आहे.

Web Title : सतारा ZP चुनाव 2026: बीजेपी का खाता खुला, माण में एक निर्विरोध

Web Summary : सतारा ZP चुनाव में गरमाहट। बीजेपी ने माण में निर्विरोध सीट जीती। 65 ZP और 130 पंचायत समिति सीटों पर बहुकोणीय मुकाबले की उम्मीद। पाटन, वाई, महाबलेश्वर में अहम लड़ाई।

Web Title : Satara ZP Election 2026: BJP Opens Account, One Unopposed in Man

Web Summary : Satara ZP election heats up. BJP gains unopposed seat in Man. Multi-cornered fights expected across 65 ZP and 130 Panchayat Samiti seats. Key battles in Patan, Wai, Mahabaleshwar.