Satara: उंडाळेजवळ टेम्पोची दुचाकीला धडक, जखमी दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 13:01 IST2025-03-10T13:01:39+5:302025-03-10T13:01:57+5:30
उंडाळे: कराड- चांदोली रोडवर उंडाळे जिंती नाक्यावर टेम्पोने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरेश ...

Satara: उंडाळेजवळ टेम्पोची दुचाकीला धडक, जखमी दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू
उंडाळे: कराड- चांदोली रोडवर उंडाळे जिंती नाक्यावर टेम्पोने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरेश हरिबा धाईगंडे (वय-४१) असे मृताचे नाव आहे. धाईगंडे हे ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे कर्मचारी होते. शनिवारी (दि.८) हा अपघात झाला.
याबाबत माहिती अशी की, धाईगंडे हे शेवाळेवाडीकडून आपले काम आटवून घराकडे निघाले होते. दरम्यान, कराडहून रत्नागिरीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने धाईगंडे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर तातडीने ग्रामस्थ गोळा झाले. कराड चांदोली रोडवर उंडाळे नजीक ग्रामस्थांनी या मार्गावर स्पीड ब्रेकर किंवा झेब्रा क्रॉसिंग करावे अशी मागणी वेळोवेळी केली होती. पण बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. या परिसरात आजपर्यंत अनेक अपघात घडले या सर्व अपघातांना बांधकाम विभाग जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अपघाताची नोंद उंडाळे पोलिसात झाली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.