साताऱ्यात संभाजी महाराजांचा २५ फुटी पुतळा ठरणार शौर्याचे प्रतीक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 19:21 IST2026-01-13T19:21:16+5:302026-01-13T19:21:46+5:30
गोडोली तळ्यात पाया तयार करण्याचे काम सुरु

साताऱ्यात संभाजी महाराजांचा २५ फुटी पुतळा ठरणार शौर्याचे प्रतीक
सातारा : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साताऱ्यातील गोडोली तळ्याच्या मध्यभागी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा २५ फुटी भव्य-दिव्य पुतळा उभारला जात असून, या कामाला आता वेग आला आहे. पुणे येथील शिल्पकारांकडून हा पुतळा साकारला जात असून, तो छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचे आणि पराक्रमाचे प्रतीक ठरणार आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या संकल्पनेतून स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा हा भव्य पुतळा साकारला जात आहे. पुणे येथील प्रसिद्ध शिल्पकार संजय परदेशी आणि सहायक शिल्पकार नवीन शेगमवार यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे. सुरुवातीला पुतळा कसा दिसेल? याची कल्पना देण्यासाठी आधी लहान व नंतर फायबरपासून २५ फूट उंच प्रतिकृती तयार करण्यात आली.
खासदार उदयनराजे आणि कल्पनाराजे भोसले यांनी या प्रतिकृतीची पाहणी केली. त्यांनी सुचवलेल्या आवश्यक बदलांनंतर, शासनाच्या कला संचालनालयाची परवानगी घेऊन या प्रतिकृतीप्रमाणेच ब्राँझ धातूचा भव्य पुतळा साकारण्याचे काम हाती घेण्यात आले. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
गोडोली तळ्यात पाया तयार करण्याचे काम सुरु
पुतळ्याचे हे काम गेल्या वर्षभरापासून सुरू असून, आता ते अंतिम टप्प्यात आले आहे. २५ फूट उंचीची ही भव्य मूर्ती ब्राँझ धातू वापरून तयार केली जात आहे. तिचे १० ते १२ भाग तयार करून ते जोडण्याचे अत्यंत नाजूक आणि महत्त्वाचे काम वेगाने सुरू आहे. पुतळ्याचे काम पुढील दोन ते तीन महिन्यांत पूर्ण होताच, तो गोडोली तलावात दिमाखात उभारला जाईल.
पालिका प्रशासनाकडून गोडोली तळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले. आता छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी तळ्याच्या मध्यभागी एक मजबूत पाया तयार करण्याचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच या तळ्यात संभाजी महाराजांचा भव्य-दिव्य पुतळा स्थापित केला जाईल. - अभिजित बापट, मुख्याधिकारी