कोयना धरणात ९१ टीएमसी पाणी; दरवाजे साडे पाच फुटांवर कायम...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 16:42 IST2021-07-27T16:41:21+5:302021-07-27T16:42:52+5:30
Rain Satara : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आणखी कमी झाला आहे. मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला ४६, नवजा ४५ आणि महाबळेश्वर सर्वाधिक ५४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात पाण्याची आवकच होत असल्याने विसर्ग सुरू आहे. धरणाचे सहाही दरवाजे साडे पाच फुटावर कायम आहेत. तसेच इतर प्रमुख धरणांतूनही पाणी सोडण्यात येत आहे.

कोयना धरणात ९१ टीएमसी पाणी; दरवाजे साडे पाच फुटांवर कायम...
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आणखी कमी झाला आहे. मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला ४६, नवजा ४५ आणि महाबळेश्वर सर्वाधिक ५४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात पाण्याची आवकच होत असल्याने विसर्ग सुरू आहे. धरणाचे सहाही दरवाजे साडे पाच फुटावर कायम आहेत. तसेच इतर प्रमुख धरणांतूनही पाणी सोडण्यात येत आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वर भागात तुफान पाऊस पडत होता. कोयना, नवजा आणि महाबळेश्वरच्या पावसाने नवीन विक्रम नोंदविला. या धुवाँधार पावसामुळे पश्चिम भागातील प्रमुख धरणांत वेगाने पाणीसाठा वाढला. कोयनासारख्या धरणात एका दिवसांत १६ टीएमसीवर पाणीसाठा वाढला. हा आतापर्यंतचा एक विक्रम ठरला. पाण्याची आवक वाढल्याने सर्वच धरणे भरु लागली आहेत.
मंगळवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात २३ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील साठा ९०.९९ टीएमसी झाला होता. धरणाचे सर्व सहा दरवाजे साडे पाच फुटांवर उघडण्यात आलेले आहेत. त्यातून ३३४८८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. तर पायथा वीजगृहातूनही २१०० क्यूसेक पाणी सोडणे सुरुच आहे. त्यामुळे कोयनेतून ऐकूण ३३४८८ क्यूसेक पाणी विसर्ग सुरू आहे. हे सर्व पाणी कोयना नदीपात्रात जात आहे. त्यामुळे कोयनेला पूर कायम आहे.
दरम्यान, जूनपासून कोयनेला २९१३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजाला ३७४४ आणि महाबळेश्वर येथे ३७३५ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. त्याचबरोबर जावळी, वाई, पाटण, सातारा या तालुक्यांतही चांगला पाऊस होत आहे.
प्रमुख धरणांतील विसर्ग असा :
मंगळवारी सकाळच्या सुमारास धोम धरणातून ४००८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. कण्हेरमधून ४३६१, कोयना ३३४८, बलकवडी ६६१, तारळी ३१६५ आणि उरमोडी धरणातून १६५१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता.