Phaltan Doctor Death: ‘त्या’ महिला डॉक्टरच्या डायरीत ८४ अन् सरकारी दप्तरी ३६ नोंदी, शवविच्छेदन अहवालातील नोंदीत तफावत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 12:28 IST2025-10-29T12:26:38+5:302025-10-29T12:28:56+5:30
महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी रोज नव्या गोष्टी पुढे येत आहेत

Phaltan Doctor Death: ‘त्या’ महिला डॉक्टरच्या डायरीत ८४ अन् सरकारी दप्तरी ३६ नोंदी, शवविच्छेदन अहवालातील नोंदीत तफावत
फलटण : येथील महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी रोज नव्या गोष्टी पुढे येत आहेत. शासकीय वैद्यकीय अधिकारी असणारी ही महिला स्वतःच्या आरोग्य विभागाबरोबरच पोलिस यंत्रणेचा बळी ठरली. ती तिच्या कामात अगदी निष्णात होती, अगदी सहजपणे ती शवविच्छेदन करायची. ती राहत असलेल्या घरातून एक खासगी नोंदवही (डायरी) समोर आली आहे. त्यात तिने आतापर्यंत केलेल्या तब्बल ८४ पेक्षा जास्त शवविच्छेदन अहवालांच्या नोंदी आहेत. प्रत्यक्षात आरोग्य विभागात त्यांच्या नावावर केवळ ३६ नोंदी आहे. डायरीमुळे नोंदीतील तफावतीचे नवीन रहस्य समोर आले आहे.
फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. अंशुमन धुमाळ यांनी दिलेल्या महितीनुसार १ जानेवारी २०२५ पासून पीडिता आत्महत्या होईपर्यंत एकूण १२९ पोस्टमार्टेम अहवाल सादर झाले आहेत. यापैकी ३६ अहवाल हे पीडिता डॉक्टर यांच्या नावावर आहेत. डॉ. दीपा भोसले यांच्या नावावर ३२ अहवाल आहेत. डॉ. सुप्रिया ननावरे यांच्या नावे २६, डॉ. केशव डाकुडे १५, डॉ. राजेंद्र रुपनवर १२, डॉ. धनश्री पाटील १५, तसेच स्वत:च्या नावावर केवळ तीन अहवाल आहेत.
‘ती’च्यावर शवविच्छेदन अहवालाचा ताण...
उपजिल्हा रुग्णालयाकडून मिळालेली माहिती पाहता पीडिता डॉक्टर यांच्यावर कामाचा सर्वाधिक ताण असल्याचे दिसून येते. ही शासकीय माहिती असली तरी पीडितेच्या खोलीवरील डायरीत केवळ दहा महिन्यांत एक दोन नव्हे, तब्बल ८४ शवविच्छेदन अहवाल केल्याच्या नोंदी आहेत.
वाचा: खाकी अन् खादीकडून ‘संस्थात्मक हत्या’; प्रकरण वेगळ्या वळणावर
२४ तास ड्युटी पॅटर्न
उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी आपापसात संगनमत करून २४ तास ड्युटी पॅटर्न राबविला. आरोग्य अधिकारी डॉ. धुमाळ यांच्या म्हणण्यानुसार हा पॅटर्न पीडिता यांच्या सांगण्यावरून व त्यांच्या अधिकारात राबविला आहे, पण चोवीस तास ड्युटी करताना कर्मचारी व अधिकारी यांची मानसिकता काय होईल, त्यात पीडितेला ‘पीजी’चा अभ्यास करण्यासाठी वेळ हवा होता, असे कारण सांगण्यात येत आहे.
वाचा : प्रशांत बनकरला ३० पर्यंत पोलिस कोठडी; पाच दिवसांची केली होती मागणी, पण...
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील अहवाल
(१ जानेवारी २०२५ पासून घटनेपर्यंत शवविच्छेदन)
एकूण शवविच्छेदन अहवाल : १२९
पीडिता डॉक्टर : ३६
डॉ. दीपा भोसले : ३२
डॉ. केशव डाकुडे : १५
डॉ. राजेंद्र रुपनवर : १२
डॉ. सुप्रिया ननावरे : २६
डॉ. धनश्री पाटील : १५
डॉ. अंशुमन धुमाळ : ३
अटकपूर्व तपासणी अहवाल
(१ एप्रिलपासून आजपर्यंत)
पीडिता डॉक्टर : ७९
डॉ. दीपा भोसले : ८५
डॉ. केशव डाकुडे : ५०
डॉ. राजेंद्र रुपनवर : ५७
डॉ. सुप्रिया ननावरे : ८८
डॉ. धनश्री पाटील : ६३
डॉ. अंशुमन धुमाळ : ००