साताऱ्यात २५ प्रभागांत ५० नगरसेवक!, प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 17:02 IST2025-10-01T17:01:56+5:302025-10-01T17:02:23+5:30
राजकीय ‘लाभा’ची इच्छुकांकडून चाचपणी

साताऱ्यात २५ प्रभागांत ५० नगरसेवक!, प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा प्रसिद्ध
सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या अंतिम प्रभाग रचनेचा नकाशा मंगळवारी सातारा पालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आला. हद्दवाढीनंतरही ही पहिलीच निवडणूक असल्याने यंदा प्रभागांची संख्या २५ झाली असून, यातून ५० नगरसेवक निवडून येणार आहे. प्रभाग रचनेचा हा नकाशा पाहण्यासाठी इच्छुक नगरसेवकांसह नागरिकांची पालिका सभागृहात दिवसभर रेलचेल सुरू होती.
सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण कराव्यात, असे आदेश शासनाला दिले आहेत. त्यामुळे स्थानिक संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू झाली आहे. निवडणुकीचा पहिला टप्पा प्रभाग रचनेचा होता. आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील नऊ पालिका व एका नगरपंचायतीकडून हा टप्पा पूर्ण करण्यात आला. शासनाने या प्रभाग रचनेला मान्यता दिल्यानंतर प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा मंगळवारी ज्या-त्या पालिकेत प्रसिद्ध करण्यात आला. हा आराखडा आता लवकरच राजपत्रात प्रसिद्ध केला जाणार आहे.
प्रभाग रचना करताना आयोगाच्या निर्देशानुसार नैसर्गिक हद्दींना प्राधान्य देण्यात आले आहे. कोणतीही फाटाफूट न करता, प्रत्येक प्रभागाच्या स्पष्ट सीमा आखण्यात आल्या आहेत. शहरातील इच्छुकांनी आपल्या प्रभागात झालेला वाढीव भागाचा समावेश आणि त्यामुळे मिळणारा राजकीय लाभ याची पालिकेत येऊन कसून चाचपणी केली. पालिकेने २०२२ पूर्वी केलेली प्रभाग रचना व नव्याने झालेली प्रभाग रचना जवळपास एकसारखीच आहे. यात फारसा बदल झालेला नसला, तरी पुढला टप्पा आरक्षण सोडतीचा असणार आहे. त्यामुळे इच्छुकांचे लक्ष या ‘महाखेळा’कडे लागले आहे. ही सोडत कधी निघते? कोणत्या प्रवर्गासाठी कोणते प्रभाग राखीव होतात? याकडे इच्छुकांच्या नजरा लागून आहेत.
हद्दवाढीमुळे वाढले संख्याबळ..
सातारा शहराची ८ सप्टेंबर २०२० रोजी हद्दवाढ झाली. दरे, शाहूपुरी, शाहूनगर, गोडोली, विलासपूर, खेडचा काही भाग पालिकेत समाविष्ठ झाला. त्यामुळे सातारा शहराच्या पूर्वीच्या प्रभाग रचनेत बदल झाला असून, प्रभागांची संख्याही २० वरुन २५ इतकी झाली आहे. त्यामुळे यंदा प्रथमच ५० नगरसेवक पालिकेत निवडून जाणार आहेत. हद्दवाढीनंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने ती रंगतदार होणार आहे.
नव्या प्रभाग रचनेचा लेखाजोखा
- एकूण प्रभाग : २५
- एकूण सदस्य संख्या : ५०
- एकूण लोकसंख्या : १,८०,५५६
- अनुसूचित जाती प्रवर्ग : २१,८००
- अनुसूचित जमाती प्रवर्ग : २०५७
अनुसूचित प्रवर्गाला प्रथमच संधी..
५० टक्के आरक्षणानुसार सातारा पालिकेत २५ महिला व २५ पुरुष उमेदवारांना निवडून द्यावयाचे आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे सहा व एक अनुसूचित जमातीचा उमेदवाराचा समावेश आहे. पालिकेच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच अनुसूचित जमातीचा उमेदवार पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येणार आहे. त्यामुळे यंदा राजकीय समीकरणे बदलू शकतात.