सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांत ४५ टीएमसी साठा, सिंचनासाठी विसर्ग सुरूच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 15:53 IST2025-05-13T15:53:18+5:302025-05-13T15:53:35+5:30

मान्सूनच्या पावसाकडे लक्ष

45 TMC storage in major dams of Satara district discharge continues for irrigation | सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांत ४५ टीएमसी साठा, सिंचनासाठी विसर्ग सुरूच 

सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांत ४५ टीएमसी साठा, सिंचनासाठी विसर्ग सुरूच 

सातारा : मान्सूनचा पाऊस वेळेत दाखल होण्याचा अंदाज असतानाच सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांत ही अजून चांगला पाणीसाठा शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. कोयनेसह सहा धरणात सुमारे ४५ टीएमसी पाणी आहे. तर कण्हेर आणि उरमोडीत चांगला साठा उपलब्ध आहे. त्यामुळे वेळेत पाऊस सुरू झाल्यास धरणांत साठा वेगाने वाढू शकतो.

जिल्ह्याच्या पश्चिम भागातच मोठी आणि प्रमुख धरणे आहेत. कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या प्रमुख धरणांची पाणी साठवण क्षमता सुमारे १४८ टीएमसीवर आहे. या धरणातील पाण्यावरच सिंचन योजना अवलंबून आहेत. तसेच अनेक गावांची तहान ही भागत आहे. दरवर्षी चांगला पाऊस झाल्यास धरणे भरतात. त्यामुळे वर्षभर चिंता नसते.

मागील वर्षीही जिल्ह्यात सरासरीच्या १२५ टक्के पर्जन्यमान झालेले. त्यामुळे पश्चिम भागातील सर्वच धरणे भरुन वाहू लागली होती. परिणामी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला नव्हता. त्यातच अजून ही या धरणांत चांगला पाणीसाठा आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत पाणी साठ्याचे वर्ष गृहीत धरले जाते. त्यामुळे एक जूनपासून नवीन वर्ष सुरू होत आहे.

जिल्ह्यातील कोयना हे सर्वात मोठे धरण. या धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणातील पाण्यावर सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सिंचन योजना अवलंबून आहेत. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी ही पाणी वापरले जाते. सध्या कोयना धरणात २९.५८ टीएमसी साठा उपलब्ध आहे. धरणात चांगला साठा असला तरी सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी ३ हजार ५०० क्युसेक पाणी सोडले जात आहे.

त्याचबरोबर धोमसह कण्हेर, तारळी, उरमोडी या धरणात ही चांगला साठा आहे. खटाव तालुक्यात येरळवाडी धरण आहे. या धरणावर अनेक गावांच्या पाणी योजना अवलंबून आहेत. या धरणात फक्त ३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. मान्सूनचा पाऊस वेळेत सुरू झाला तरच टंचाई जाणवणार नाही, अशी स्थिती आहे.

धरणांमधून ६ हजार क्युसेक विसर्ग..

जिल्ह्यातील प्रमुख ६ धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरूच आहे. कोयनातून ३ हजार ५०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. तर धोममधून ९१० क्युसेक, बलवकडीतून ३३४, कण्हेरमधून नदी आणि कालव्याद्वारे ४२० क्युसेक विसर्ग केला जातोय. उरमोडीतून ५४५ आणि तारळी धरणातून ४८३ क्युसेक विसर्ग सुरू आहे. उन्हाळी पिकांसाठी पाण्याची मागणी असल्याने विसर्ग होत आहे.

जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठा

धरण - सध्या साठा - टक्केवारी - एकूण क्षमता
कोयना - २९.५८ - २४.४३ - १०५.२५
धोम - ४.८४ - २५.९१ - १३.५०
बलकवडी - १.०० - २२.३३ - ४.०८
कण्हेर - ३.९४ - ३५.७६ - १०.१०
उरमोडी - ३.९० - ३७.२९ - ९.९६
तारळी - १.३६ - २३.०९ - ५.८५

Web Title: 45 TMC storage in major dams of Satara district discharge continues for irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.