Satara: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष; भोंदू मांत्रिकाने दिले ३० कोटी रुपये, बॉक्स उघडताच..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 12:01 IST2025-01-03T12:00:57+5:302025-01-03T12:01:17+5:30

..अन् त्यांनी व्हिडीओ रेकाॅर्डिंग केलं

36 lakh fraud of a retired employee by a fraudulent magician with the lure of raining money in satara | Satara: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष; भोंदू मांत्रिकाने दिले ३० कोटी रुपये, बॉक्स उघडताच..

Satara: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष; भोंदू मांत्रिकाने दिले ३० कोटी रुपये, बॉक्स उघडताच..

सातारा : खरं वाटावं म्हणून घरातील काळूबाई देवीसमोर भाेंदू मांत्रिकाने सहा बंदिस्त बाॅक्स दिले. त्या बाॅक्समध्ये ३० कोटी रुपये आहेत. पण, हे बाॅक्स २१ दिवसांनंतर उघडा, असे मांत्रिकाने सांगितले. आपल्याला एवढे पैसे मिळाले म्हणून सर्वजण खूश होते. जेव्हा २१व्या दिवशी हे बाॅक्स उघडले तेव्हा त्यामध्ये चक्क वर्तमान पत्रांची रद्दी निघाली. अशा प्रकारे संबंधित भोंदूबाबा आणि त्याच्या पिलावळीने एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला तब्बल ३६ लाखांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.

कांता वामन बनसोडे (वय ६०, रा. देवापूर, ता. माण) हे प्राथमिक आरोग्य केंद्रातून कनिष्ठ लिपिक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या ओळखीच्या संबंधित भोंदू मांत्रिकासह दोघांनी दैवीशक्ती व जादूटोण्याचा वापर करून पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखविले. मात्र, त्यासाठी पूजेचे साहित्य आणावे लागेल असे सांगितले. या साहित्यासाठी तब्बल ३६ लाख रुपये बनसोडे यांनी फोन पेद्वारे संबंधितांना पाठविले. एवढेच नव्हे तर बनसोडे यांच्याप्रमाणेच अन्य काही लोकांनीही पूजेसाठी कोणी १२ लाख, तर कोणी ८ लाख भोंदू मांत्रिकाकडे दिले.

ठरल्याप्रमाणे पैशांचा पाऊस पाडून मांत्रिकाने घरातील देवीसमोर बनसोडे यांच्यासह अन्य लोकांना बंदिस्त सहा बाॅक्स दिले. त्या बाॅक्समध्ये तब्बल ३० कोटी रुपये असल्याचे त्यांना सांगण्यात आले. पण, हे बाॅक्स २१ दिवस पूर्ण झाल्यानंतरच उघडायचे, असे त्याने त्यांच्याकडून वदवून घेतले. बंदिस्त बाॅक्स बनसोडे व इतर लोकांनी घरी नेल्यानंतर सर्वजण २१ दिवस कधी पूर्ण होताहेत, याची वाट पाहात होते. अखेर तो दिवस उजाडणार तोच मांत्रिकाने फोन करून सांगितले, बाॅक्स उघडू नका. तांत्रिक अडचण आली आहे.

..अन् त्यांनी व्हिडीओ रेकाॅर्डिंग केलं

मांत्रिकाने दिलेले सहा बाॅक्स उघडण्यापूर्वी बनसोडे यांच्यासह अन्य तक्रारदारही एकत्र आले. या सर्वांनी ठरवलं. मांत्रिकाचे ऐकायचे नाही. आपण बाॅक्स उघडायचे. याचे व्हिडीओ शूटिंग करायचं त्यांनी ठरवलं. हळूहळू सहा बाॅक्स त्यांनी उघडण्यास घेतले. सर्व बाॅक्स उघडून झाल्यानंतर त्यामध्ये तीस कोटी नव्हे तर चक्क वर्तमानपत्रांची रद्दी निघाली.

म्हणे, पोलिसांनी दखल घेतली नाही

बनसोडे यांनी त्यांची तक्रार स्थानिक पोलिस ठाण्यात केली. परंतु, त्यांची तक्रार पोलिसांनी घेतली नसल्याचा त्यांनी आरोप केला आहे. संबंधित मांत्रिकावर वेळीच कारवाई न झाल्यास त्याच्या गळाला आणखी कितीतरी लोक लागतील, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

Web Title: 36 lakh fraud of a retired employee by a fraudulent magician with the lure of raining money in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.