Satara: पाचगणीतील हाॅटेलमध्ये नाचविल्या बारबाला; १२ बारबालांसह ३२ जण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 12:32 IST2025-01-09T11:47:59+5:302025-01-09T12:32:49+5:30
पोलिसांचा छापा; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

संग्रहित छाया
सातारा/पाचगणी : पाचगणी, ता. महाबळेश्वर येथील कासवंड परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकून १२ बारबाला तसेच २० गिऱ्हाइकांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर पाचगणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून ध्वनिक्षेपक यंत्रणा, माईक, मोबाइल, कार, असा सुमारे २५ लाख ४५ हजारांचा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला.
पाचगणीसारख्या जागतिक पर्यटनस्थळाच्या ठिकाणी गायिकांच्या व महिला वेटरच्या नावाखाली बारबाला महिला आणल्या जातात. त्यांना संगीताच्या तालावर कमी कपड्यात बीभत्स हावभाव व अंगविक्षेप करून नृत्य करण्यास भाग पाडले जाते, याची माहिती पाचगणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी मंगळवारी रात्री त्यांच्याकडील पोलिसांच्या खास पथकाला घेऊन भिलार, कासवंड हद्दीतील हॉटेल हिराबाग (बिलिव्ह) वर छापा टाकला.
यावेळी तेथे १२ बारबाला आळीपाळीने येऊन उत्तान कपड्यात २० गिऱ्हाइकांसमोर नृत्य करत होत्या. तसेच गिऱ्हाइकांशी त्या लगट करीत असल्याचे पोलिसांना दिसून आले. तर काही जण बारबालांसमवेत नृत्य करत होते. या १२ बारबालांसह हाॅटेल मालक व इतर २० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच साऊंड सिस्टीम, माईक यासह अन्य साहित्य हाॅटेलमधून जप्त करण्यात आले. संशयितांवर महाराष्ट्र हाॅटेल आणि मद्यपान कक्ष (बाररूम)मधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध तसेच दारूबंदी अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बालाजी सोनुने, सहायक फौजदार रवींद्र कदम, हवालदार श्रीकांत कांबळे, कैलास रसाळ, विनोद पवार, सचिन बोराटे, पोलिस नाईक तानाजी शिंदे, कॉन्स्टेबल उमेश लोखंडे, सुमित मोहिते, रेखा तांबे यांनी केली.