Satara ZP Results 2026: २२ वर्षाच्या मृणाल पाटील यांनी मैदान मारलं! नरेंद्र पाटलांच्या पत्नी प्राची पाटलांचा केला पराभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 19:05 IST2026-02-09T19:04:14+5:302026-02-09T19:05:19+5:30
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत एका निकालाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आणि हा निकाल चर्चेचा विषय ठरत आहे.

Satara ZP Results 2026: २२ वर्षाच्या मृणाल पाटील यांनी मैदान मारलं! नरेंद्र पाटलांच्या पत्नी प्राची पाटलांचा केला पराभव
सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ जागांसाठी निवडणूक झाली. आज (९ जानेवारी) निकाल जाहीर झाले. यात मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटात माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना झटका बसला. नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील यांचा पराभव झाला. शिंदेसेनेकडून निवडणूक लढवत असलेल्या २२ वर्षीय मृणाल पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला.
माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील या भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. शिंदेसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यात ताकद पणाला लावली होती. पाटण तालुक्यातच मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटातून शिंदेसेनेने मृणाल पाटील यांना उमेदवारी दिली होती. सातारा जिल्ह्यात सर्वात कमी वय असलेल्या सदस्या म्हणून मृणाल पाटील विजयी झाल्या आहेत.
भाजपाचे मंत्री जयकुमार गोरे यांनी शंभूराज देसाई यांच्या विरोधात पाटण तालुक्यात आक्रमक प्रचार केला होता. जिल्हा परिषद निवडणूक युती करून लढवण्याची भाजपा नेत्यांची इच्छा होती. शंभूराज देसाईंनी यासाठी बैठक बोलावली, पण त्याच बैठकीकडे भाजपाच्या नेत्यांनी पाठ फिरवली होती.
आता पाटण पंचायत समितीमध्येही शंभूराज देसाई यांनी शिंदेसेनेची सत्ता आणत भाजपा नेत्यांना जोरदार उत्तर दिले आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद निवडणुकीतही पाटणमध्ये भाजपाला धक्का दिला आहे.
सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल
भाजपा -२३
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) -२२
शिंदेसेना - १३
उद्धवसेना - ०
काँग्रेस -१
इतर - २