कऱ्हाड : लोकसभा निवडणुकीचा पाटण विधानसभा मतदार संघातील बंदोबस्त संपवून निघालेल्या पोलिसांच्या खासगी आराम बसला अपघात झाला. त्यामध्ये पंधरा पोलिस कर्मचारी जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. कऱ्हाड-पाटण मार्गावर मुंढे, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीत काल, बुधवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.संदीप साहेबराव पवार, लक्ष्मण ईरान्ना सुतार व बसचालक अजित सुरेश नलवडे अशी गंभीर जखमींची नावे आहेत. तर विशाल वामनराव मोरे, दत्ताराव रामेश्वर पायघण, प्रदीप राजेंद्र लोहार, मोहन राजाराम रणमाळ, ओंकार हिंदुराव बोराटे, हणमंत राजू गोडसे, सद्दाम रसुल पिंजारी, कृष्णा विजय बरसे, विठ्ठल रमेश हजारे, विक्रांत सुखदेव नरळे, प्रशांत प्रकाश जगताप, प्रकाश जगन्नाथ काटकर, विशाल यशवंत गाडे, ऋषिकेश शांताराम गांजे, शुभम अनिल पाटील, मौला कबीर शेख, विकास गोविंद वारजे, महबूब कबीर गुलाणी या किरकोळ जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना उपचार करून रुग्णालयातून सोडून देण्यात आले.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीतील बंदोबस्तासाठी तुरची (ता. तासगाव) येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील पोलिस कर्मचारी पाटण येथे नेमण्यात आले होते. बंदोबस्त आटोपून बुधवारी सकाळी हे कर्मचारी पुन्हा खासगी आराम बसने (क्र. एमएच ५० एन ५०२०) तुरचीला निघाले होते. कऱ्हाडनजीक मुंढे गावच्या हद्दीत बस आली असताना एक टेम्पो महामार्गाच्या छेदरस्त्यातून अचानक समोर आला.त्यामुळे टेम्पोला चुकविण्याच्या प्रयत्नात बसवरील चालकाचा ताबा सुटून बस रस्त्यानजीकच्या गटारसह पडक्या घराला धडकली. या अपघातात १५ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून तिघे गंभीर आहेत. त्यांच्यावर कऱ्हाडच्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. किरकोळ जखमी असलेल्या कर्मचाऱ्यांना उपचार करून सोडून देण्यात आले.दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक समीर शेख, उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांनी अपघातस्थळी भेट दिली.
टेम्पो चालकावर गुन्हा दाखलदरम्यान, महामार्गाच्या छेदरस्त्यातून टेम्पो अचानक आडवा आल्यामुळे हा अपघात घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. त्यामुळे टेम्पोचालक राजू सुरेश माने (रा. जलालपूर, ता. रायबाग, जि. बेळगाव, कर्नाटक) याच्याविरुद्ध कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.