सातारा जिल्ह्यातील ९ नगरपालिकांतील २३३ पैकी १३९ जागा खुल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 13:12 IST2025-10-09T13:11:23+5:302025-10-09T13:12:02+5:30
सातारा पालिकेत होणार ५० नगरसेवक

सातारा जिल्ह्यातील ९ नगरपालिकांतील २३३ पैकी १३९ जागा खुल्या
सातारा : जिल्ह्यातील ९ नगरपालिकांच्या २३३ जागांसाठी बुधवारी आरक्षण सोडत झाली. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी (महिलांसह) १३९ जागा असून, ओबीसींसाठी ६० तर अनुसूचित जाती ३२ आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी २ जागा राखीव झाल्या आहेत. जिल्ह्यात सातारा नगरपालिका मोठी असून, येथे एकूण ५० नगरसेवक जागांसाठी आरक्षण सोडत झाली.
जिल्ह्यातील सातारा, कराड, मलकापूर, म्हसवड, रहिमतपूर, फलटण, वाई, महाबळेश्वर आणि पाचगणी या ९ नगरपालिकांची मुदत चार वर्षांपूर्वी संपली आहे. त्यामुळे या पालिकांवर प्रशासक राजवट आहे. दोन दिवसांपूर्वी नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले होती. तर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका कार्यक्षेत्रात प्रभागांची आरक्षण सोडत बुधवारी सकाळी ११ वाजता काढण्यात आली. एकूण ११५ प्रभागांसाठी हे आरक्षण होते.
असे आहे, जातनिहाय आरक्षण..
जिल्ह्यातील नगरपालिकांसाठी एकूण २३३ नगरसेवकांना निवडून द्यायचे आहे. खुल्या प्रवर्गातून १३९ जण (महिलांसह) नगरसेवक होणार आहेत. यामध्ये सातारा पालिकेत २९, मलकापूरला १३, म्हसवड १२, रहिमतपूर १३, कराड १९, फलटण १५, वाई १५, महाबळेश्वर १२ आणि पाचगणीत ११ जणांना संधी मिळणार आहे. अनुसूचित जाती (महिलांसह) प्रवर्गातून ३२ नगरसेवक होणार आहेत. सातारा पालिकेत ६, वाई, मलकापूर आणि म्हसवड प्रत्येकी ३, रहिमतपूर २, कराड ४, फलटणला ५ जणांना संधी मिळेल.
अनुसूचित जमातीसाठी सातारा आणि महाबळेश्वर येथे प्रत्येकी एक जागा आरक्षित आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गात महिलांसह (ओबीसी) ६० जागा आरक्षित झाल्या आहेत. सातारा पालिकेत १४, मलकापूर ६, वाई, म्हसवड, रहिमतपूर, महाबळेश्वर आणि पाचगणीला प्रत्येकी ५, कराडला ८, फलटण ७ जागा राखीव आहेत.
मेढा नगरपंचायतीसाठी १७ नगरसेवक..
मेढा नगरपंचायतीचीही सार्वत्रिक निवडणूक नगरपालिकांसोबत होणार आहे. एकूण १७ नगरसेवकांना निवडून द्यायचे आहेत. खुल्या प्रवर्गातून ९, ओबीसी ५, अनुसूचित जाती २ आणि अनुसूचित जमातीमधून एक जणाला निवडून द्यायचे आहे.