सातारा जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पात १३४ टीएमसी पाणीसाठा, कोयनेतून १०५० क्यूसेक विसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 19:49 IST2025-12-18T19:49:10+5:302025-12-18T19:49:29+5:30
अजूनही सिंचनासाठी कमीच मागणी : कोयनेत ९४ टीएमसीवर पाणी उपलब्ध

संग्रहित छाया
सातारा : जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस झाल्याने सर्वच धरणे भरली होती. तसेच, चांगली पाणीसाठाही झाला होता. यामुळे रब्बी हंगामातील सिंचनासाठी अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी मागणी नाही. या कारणाने जिल्ह्यातील प्रमुख सहा मोठ्या प्रकल्पात सध्या सुमारे १३४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. तर, कोयना धरणात अजूनही ९४.७४ टीएमसी पाणीसाठा आहे.
सातारा जिल्ह्यात प्रामुख्याने खरीप आणि रब्बी असे दोन प्रमुख हंगाम घेतले जातात. येथील शेती पावसावर अवलंबून आहे. तसेच, धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावरही हंगाम घेतला जातो. मान्सूनचा पाऊस चांगला झाला, तर शेतीसाठी पाणी पुरेसे होते. मागील दोन वर्षांत जिल्ह्यात चांगला पाऊस होत आला आहे. यामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांनाही पाण्याची टंचाई जाणवली नाही. तसेच, जिल्ह्यातील काही धरणांतील पाणी हे साताऱ्याबरोबरच सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतीसाठीही जाते.
जिल्ह्यात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी अशी प्रमुख सहा धरणे आहेत. या धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे १४८ टीएमसी आहे. यामध्ये सर्वाधिक मोठे धरण हे कोयना असून, पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती होते. तसेच, सिंचन आणि पिण्यासाठीही पाणी सोडले जाते.
मागीलवर्षीप्रमाणे यंदाही कोयना धरण भरलेले होते. तसेच, इतर सर्व प्रमुख धरणेही भरून वाहिली. त्यामुळे यंदा सिंचन आणि पिण्यासाठी पाणी कमी पडणार नाही. सध्या कोयना धरणात ९० टक्के पाणीसाठा आहे. तसेच, इतर प्रमुख धरणांतही चांगला पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातच यंदा अजूनही सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची मागणी नाही. त्यामुळे धरणांतून विसर्ग कमी आहे. काही धरणांतून पाणी बंद आहे. तरीही पुढील महिन्यापासून सिंचनासाठी मागणी वाढणार आहे. त्यानंतरच सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे.
मागीलवर्षीपेक्षा सहा टीएमसी साठा कमी...
जिल्ह्यातील सर्व प्रमुख धरणे मागीलवर्षी पूर्णपणे भरली होती. सध्या या सहा धरणांत एकूण १३३.७८ टीएमसी पाणीसाठा आहे. तर, गेल्यावर्षी १७ डिसेंबरला याच धरणांमध्ये १४०.२९ टीएमसी पाणसाठा होता. यावरून यंदा धरणांत सुमारे सहा टीएमसी पाणीसाठा कमी आहे. कोयना धरणात मागीलवर्षी सुमारे ९९ टीएमसी पाणी होते. यावर्षी साठा कमी झालेला आहे.
कोयनेतून १०५० क्यूसेक विसर्ग...
जिल्ह्यातील प्रमुख काही धरणांतून विसर्ग सुरू आहे. यामध्ये कोयनेच्या पायथा वीजगृहातून १ हजार ५० क्यूसेक विसर्ग करण्यात येत आहे. त्याचबरोबर कण्हेर धरणातून १५०, तारळीमधून २७६ आणि धोम धरणातून ५७३ क्यूसेक विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा...
धरण - सध्या साठा - टक्केवारी - एकूण साठा
धोम - ११.७७ - ८७.१४ - १३.५०
कण्हेर - ९.१४ - ९०.५२ - १०.१०
कोयना - ९४.७४ - ९० - १०५.२५
बलकवडी - ४.०५ - ९८.९६ - ४.०८
तारळी - ४.४४ - ७५.८१ - ५.८५
उरमोडी - ९.६४ - ९६.८४ - ९.९६