सातबारा नोंदीसाठी मागितले १ लाख, साताऱ्यात लाच घेताना मंडलाधिकारी जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 12:13 IST2025-06-06T12:12:45+5:302025-06-06T12:13:24+5:30

लाच घेताना रंगेहाथ पकडले

1 lakh demanded for Satbara registration, divisional officer caught taking bribe in Satara | सातबारा नोंदीसाठी मागितले १ लाख, साताऱ्यात लाच घेताना मंडलाधिकारी जाळ्यात

सातबारा नोंदीसाठी मागितले १ लाख, साताऱ्यात लाच घेताना मंडलाधिकारी जाळ्यात

सातारा : शेतजमिनीची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी ७५ हजारांची लाच घेताना खिंडवाडी, ता. सातारा येथील मंडलाधिकारी अजित दादासाहेब घाडगे (वय ४८, रा. कृष्णानगर, वनवासवाडी, सातारा) याला लाचलुचपत विभागाने गुरुवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले.

यातील तक्रारदाराने खिंडवाडी, ता. सातारा येथील शेतजमिनीचे कुळ मुखत्यारपत्र घेतले आहे. तक्रारदाराने मंडालाधिकारी घाडगे यांच्याकडे दस्त नोंदणीसाठी आक्षेप नोंदवला होता. या आक्षेपावरून फेरफार रद्द करण्यासाठी तसेच सातबारावरील ४७ गुठ्यांची नोंद तुमच्या बाजूने करून देण्यासाठी मंडलाधिकारी घाडगे याने १ लाखाची लाच तक्रारदाराकडे मागितली होती. सुरुवातीला ७५ हजार व सातबाऱ्यावर नाव आल्यास उर्वरित २५ हजार रुपये त्याने मागितले. 

या प्रकारानंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभागात जाऊन रीतसर लेखी तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत विभागाने पडताळणी केली असता मंडलाधिकारी घाडगे हा लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. गुरुवारी सायंकाळी लाचलुचपत विभागाने मंडलाधिकारी कार्यालयात सापळा लावला. यावेळी घाडगे याला ७५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

सातारा शहर पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन गोगावले, गणेश ताटे, नीलेश राजपुरे यांनी केली.

Web Title: 1 lakh demanded for Satbara registration, divisional officer caught taking bribe in Satara