Sangli Crime: जेवण उशिरा बनवले म्हणून तरुणाचा खून, दोन स्थानिक कामगारांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:55 IST2025-01-30T12:52:25+5:302025-01-30T12:55:29+5:30
वादावादीचे रूपांतर हाणामारीत

Sangli Crime: जेवण उशिरा बनवले म्हणून तरुणाचा खून, दोन स्थानिक कामगारांना अटक
कुपवाड : जेवण उशिरा बनविल्याच्या कारणावरून कुपवाड एमआयडीसीमधील एका कारखान्यात परप्रांतीय कामगार इद्रीस गौरीशंकर यादव (वय २३, रा.साहूपूर, उत्तर प्रदेश, सध्या रा.कुपवाड एमआयडीसी) याचा खून करण्यात आला. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी संशयित वैभव सहदेव कांबळे (वय २१) व चिदानंद उर्फ संतोष मायाप्पा खोत (वय २३, दोघेही रा.सलगरे, ता.मिरज) यांना अटक केली आहे.
कुपवाड एमआयडीसीमध्ये एका औषध विक्री करणाऱ्या कंपनीने गोदामासाठी हा कारखाना काही दिवसांपूर्वी विकत घेतला आहे. या कारखान्यामध्ये खासगी ठेकेदाराकडून फॅब्रिकेशनचे काम सुरू होते. हे काम पंधरा दिवसांपासून सुरू होते. या कामासाठी मृत आणि दोघा संशयितांची ठेकेदाराकडून नियुक्ती केली होती. मंगळवारी, २८ जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे संबंधित कामावर नियुक्त असलेल्या कामगारांकडून जेवण बनविणे सुरू होते.
यावेळी रात्री जेवण उशिरा दिल्याच्या कारणावरून आणि चपाती कच्ची दिल्याच्या कारणावरून संशयित वैभव कांबळे व चिदानंद खोत आणि इद्रीस यादव या तिघा कामगारामध्ये वादावादी सुरू झाली. वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले. वैभव आणि चिदानंद यांनी केलेल्या मारहाणीत इद्रीस यादव याचा मृत्यू झाला.
खुनाच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोकर, पोलिस उपअधीक्षक प्रणील गिल्डा, सहायक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. या खुनाच्या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली असून, एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.
वादावादीचे रूपांतर हाणामारीत
मंगळवारी रात्री वादावादी उशिरापर्यंत सुरू होती. या वादावादीचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. या हाणामारीच्या दरम्यान बहिणीवरून शिवीगाळ केल्याच्या कारणावरून संशयितांनी लाकडी दांडके इद्रीस यादव याच्या डोक्यात घातले, तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीमध्ये इद्रीस याचा मृत्यू झाला.
संशयित तत्काळ अटक
घटनास्थळी उपस्थित असलेला आणखी एक कामगार हा या तिघांचे भांडण सुरू असताना लांब जाऊन दुसऱ्या खोलीत बसला. कामगार इद्रीस मृत झाल्यानंतर संशयितांनी कंपनीने नेमलेल्या खासगी ठेकेदाराला हा प्रकार सांगितला. त्यानंतर, ठेकेदाराने एमआयडीसी पोलिसांना ही घटना कळविली. पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. संशयित आरोपींना गजाआड केले.