Sangli Crime: शेतात खांब लावण्याच्या वादातून तरुणाचा खून, सख्ख्या चुलतभावांसह चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 14:14 IST2025-03-21T14:14:21+5:302025-03-21T14:14:56+5:30
सांगली : कर्नाळ (ता. मिरज) येथे शेतात खांब का लावतोस म्हणून सत्यजित विकास कांबळे (वय २२) याच्यावर सख्ख्या चुलतभावांसह ...

Sangli Crime: शेतात खांब लावण्याच्या वादातून तरुणाचा खून, सख्ख्या चुलतभावांसह चौघांना अटक
सांगली : कर्नाळ (ता. मिरज) येथे शेतात खांब का लावतोस म्हणून सत्यजित विकास कांबळे (वय २२) याच्यावर सख्ख्या चुलतभावांसह पाचजणांनी कोयत्याने, काठीने वार करून खून केल्याचा प्रकार घडला. संशयित शुभम शैलेश कांबळे (२४), सोमेश शैलेश कांबळे (१९), स्वराज ऊर्फ कुणाल बाळासाहेब कांबळे (२१, रा. पाण्याच्या टाकीजवळ, कर्नाळ), हणमंत दिगंबर गायकवाड (१८, रा. समर्थ कॉलनी, शंभरफुटी रस्ता, सांगली) या चौघांना सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली. तर एका अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले.
कर्नाळ येथील विकास बाबुराव कांबळे (५६) हे दि. १८ रोजी सायंकाळी त्यांच्या कर्नाळ ते डिग्रज रस्त्यावरील शेतजमिनीत हद्दीचे खांब लावत होते. त्यांचा मुलगा सत्यजित हा सोबत होता. त्यावेळी संशयित पाचजण तेथे आले. त्यांच्या हातात कोयता, काठी होती. त्यांनी सत्यजितला ‘तू व तुझे कुटुंब शेतात हद्द कायम करण्यासाठी खांब का लावताय’ अशी विचारणा केली. त्यावर वाद सुरू झाला तेव्हा शुभम कांबळे याने हातातील कोयत्याने सत्यजित याच्या डोक्यात पाठीमागे दोनवेळा वार केला.
तुला जिवंत सोडत नाही असे म्हणून कोयत्याने पुन्हा वार करत असताना सत्यजित बचावासाठी डोक्यावर दोन्ही हात ठेवून तो बाजूला सरकला. तेवढ्यात स्वराज याने हातातील काठीने त्याच्यावर हल्ला चढवला. तेथे असलेला प्रणव हा जखमी सत्यजितला वाचवण्यासाठी मध्ये पडला तेव्हा सोमेश, स्वराज आणि युवकाने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. सत्यजितचे वडील विकास व नातेवाईकमध्ये पडले असता सोमेश याने दगड फेकून मारहाण करत घटनास्थळावरून पलायन केले.
जखमी सत्यजितला सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. वडील विकास यांनी सांगली ग्रामीणमध्ये खुनी हल्ल्याबद्दल गुन्हा दाखल केला. अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली ग्रामीण पोलिसांना संशयितांना पकडण्यासाठी आदेश दिले. त्यानुसार पोलिस निरीक्षक किरण चौगले यांचे पथक संशयितांच्या मागावर होते. त्यांना कर्नाळ ते बुधगाव रस्त्यावर रेल्वे पुलाजवळ आणि सांगलीत बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले. संशयितांनी हल्ल्याची कबुली दिली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची कोठडी सुनावली.
उपचार सुरू असताना मृत्यू
सत्यजित कांबळे याच्यावर सख्ख्या चुलतभावासह पाचजणांनी केलेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. सिव्हील हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. दि. १९ रोजी रात्री त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे संशयितांवर खुनाचे वाढीव कलम लावण्यात आले.
चौघे संशयित तरुण
शेतात खांब का लावतोस कारणावरून खून करणारे संशयित अवघे १८ ते २४ वर्षाचे तरुण आहेत. रागातून त्यांनी केलेल्या हल्ल्यात २२ वर्षीय सत्यजितला प्राण गमवावे लागले.