सांगली जिल्हा परिषदेत तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, सीईओंच्या दालनासमोरच पेट्रोल ओतून घेतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 14:48 IST2025-08-05T14:47:35+5:302025-08-05T14:48:02+5:30
सांगली : ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरोधातील चौकशी प्रक्रियेत जिल्हा परिषद प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप करत एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. ...

सांगली जिल्हा परिषदेत तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, सीईओंच्या दालनासमोरच पेट्रोल ओतून घेतले
सांगली : ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरोधातील चौकशी प्रक्रियेत जिल्हा परिषद प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप करत एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोरच पेट्रोल ओतून घेतले. कर्मचाऱ्यांनी त्याला पेटवून घेण्यापासून परावृत्त केले.
प्रहार जनशक्ती संघटनेचे मिरज तालुका उपाध्यक्ष परशुराम बनसोडे (रा. खटाव, ता. मिरज) असे आंदोलकाचे नाव आहे. चार महिन्यांपूर्वी केलेल्या तक्रारीची तड लागत नसल्याचा त्यांचा आरोप होता. सोमवारी सकाळी त्यांनी मिरज पंचायत समितीत आपल्या तक्रारीचे काय झाले? याची चौकशी केली. तेथील अधिकाऱ्यांनी अहवाल जिल्ह्याला पाठविल्याचे सांगितल्यानंतर बनसोडे जिल्हा परिषदेत आले. त्यांच्यासोबत संजय कागवाडे व गणेश खटावकर हे तक्रारदारही होते. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेतली. कार्यवाहीची चौकशी केली.
धोडमिसे यांनी योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिले; पण त्यावर समाधान न झाल्याने बनसोडे दालनाबाहेर आले. सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल पॅसेजमध्ये उभे राहून अचानक अंगावर ओतून घेतले. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने अभ्यागतांची गर्दी होती. त्यांनी व कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने बनसोडे यांच्या हातातून बाटली काढून घेतली. त्यांना पेटवून घेण्यापासून रोखले. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांना प्रशासनाने कळविले. दरम्यान, बनसोडे यांनी प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. कार्यवाही केली नाही, तर स्वातंत्र्यदिनी मुंबईत आत्मदहनाचा इशारा दिला.
काय आहे तक्रार?
बनसोडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य संजय कागवाडे, गणेश खटावकर यांनी एप्रिल महिन्यात जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती. त्यानुसार ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजनांत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा त्यांचा दावा आहे. जनसुविधा, नागरी सुविधा, पाणीपुरवठा, दलित वस्ती विकास आदी कामांत ग्रामपंचायत अधिकारी संजयकुमार गायकवाड यांनी मनमानी केली आहे. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांमार्फत त्यांची चौकशी करून निलंबित करावे. त्यांनी विविध निविदा प्रक्रियेत अनियमितता केली आहे.
ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याच्या काळात ग्रामपंचायत अधिकारी व सरपंचांनी निविदा प्रक्रिया केली आहे. त्याचीही चौकशी करावी, अशी तक्रार केली होती. या तक्रारीनुसार जिल्हा परिषदेने चौकशी प्रक्रिया पूर्ण केली. मिरज पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांच्यामार्फत चौकशी केली.
बनसोडे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा घेण्यात येईल. त्यानंतर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल. - शशिकांत शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)