सांगली : कुत्रे अंगावर सोडल्याच्या गैरसमजातून सांगलीत एका तरुणावर ब्लेडने खुनी हल्ला करण्यात आला. त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाणही झाली. ही घटना रविवारी (दि. १६) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वडर गल्ली परिसरात दफनभूमीजवळ घडली.हल्ल्यात प्रमोद सुकाप्पा झेंडे (२८, रा. अच्युतराव कुलकर्णी प्लॉट, माकडवाले गल्ली, सांगली) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या फिर्यादीनुसार विश्रामबाग पोलिसांनी राजू यल्लाप्पा जोंधळे आणि त्याचा मुलगा साहिल (दोघेही रा. अच्युतराव कुलकर्णी प्लॉट, सांगली) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.प्रमोद आणि राजू जोंधळे हे वडर गल्लीतून पानटपरीकडे निघाले होते. त्यावेळी राजूचा पाय रस्त्यावर बसलेल्या कुत्र्यावर पडला. त्यामुळे कुत्रे जोंधळे याच्यावर अंगावर गेले. पण प्रमोद झेंडे यानेच कुत्र्यास आपल्या अंगावर ढकलले असा गैरसमज करून जोंधळे याने वाद घातला. दंगा ऐकून राजू याचा मुलगा साहिलदेखील तेथे आला. बापलेकांनी मिळून प्रमोद याला खाली पाडले. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. साहिल याने प्रमोद याच्या हातावर, छातीवर, मानेवर ब्लेडने वार करून शिवीगाळ केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता ११८(१), ३५२, ३५१(२), ३(५) नुसार गुन्हे दाखल केले आहेत.
कुत्रे अंगावर सोडल्याच्या गैरसमजातून तरुणावर हल्ला, सांगलीत बापलेकावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 16:07 IST