Sangli Crime: खानापूर येथे तरुणाचा गुंडाकडून निर्घृण खून, संशयित पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 18:31 IST2025-10-21T18:31:36+5:302025-10-21T18:31:51+5:30
रात्री दोघेजण दारू पिण्यासाठी एकत्र आले होते, अशी माहिती तपासात पुढे आली

Sangli Crime: खानापूर येथे तरुणाचा गुंडाकडून निर्घृण खून, संशयित पसार
खानापूर येथील विजापूर-गुहागर मार्गावरील हजारे हॉस्पिटल शेजारी पूर्व वैमनस्यातून जयंत विश्वास भगत (वय ३५, रा. खानापूर) याचा धारदार शस्त्राने निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडली. भगत याच्या खूनप्रकरणी जावेद मुबारक अत्तार या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेली व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, मृत जयंत भगत आणि संशयित जावेद अत्तार या दोघांमध्ये जुना वाद होता. जावेद अत्तार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर हद्दपारची कारवाई देखील झाली होती. सोमवारी रात्री दोघेजण दारू पिण्यासाठी एकत्र आले होते, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. विजापूर-गुहागर मार्गावरील हजारे हॉस्पिटल शेजारी दोघांमध्ये सायंकाळी साडेसातच्या सुमारास पूर्वीच्या वादातून भांडण झाले.
तेव्हा जावेद याने धारदार शस्त्राने भगत याच्या गळ्यावर वार केले. गळ्यावर वर्मी वार बसल्याने भगत हा गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर जावेद हा तेवून पसार झाला. नागरिकांनी जखमी भगत याला भिवघाट येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
विटा पोलिसांना माहिती मिळताच निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. उपाधीक्षक विपुल पाटील यांनी देखील तत्काळ घटनास्थळी येऊन माहिती घेतली. तसेच विटा पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या. प्राथमिक तपासात जावेदत्त यांनी खून केल्याची माहिती मिळताच त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली.
सीसीटीव्ही फुटेज तपासले
जयंत भगत याचा खून झाल्यानंतर विटा पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत संशयित आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू होते.