'हळदी'च्या अंगानिशी सांगलीचा योगेश निघणार 'सिंदूर' मोहिमेवर, सीमेवर आज रवाना होणार
By घनशाम नवाथे | Updated: May 10, 2025 12:10 IST2025-05-10T12:07:55+5:302025-05-10T12:10:09+5:30
घनशाम नवाथे सांगली : घरातील मंडळींनी लग्न ठरवल्यामुळे ४० दिवसांच्या सुटीवर तो आला. पाच तारखेला लग्न झाले. दुसऱ्याच दिवशी ...

'हळदी'च्या अंगानिशी सांगलीचा योगेश निघणार 'सिंदूर' मोहिमेवर, सीमेवर आज रवाना होणार
घनशाम नवाथे
सांगली : घरातील मंडळींनी लग्न ठरवल्यामुळे ४० दिवसांच्या सुटीवर तो आला. पाच तारखेला लग्न झाले. दुसऱ्याच दिवशी सैन्यदलाच्या सर्व सुट्या रद्द करून कर्तव्यावर हजर राहण्याचा संदेश आला. ते ऐकून सर्वांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. अंगावरची हळद निघण्यापूर्वीच तो राजस्थानमध्ये रणगाडा चालवण्यास जात आहे. शनिवारी दुपारी रेल्वेने रवाना होत असल्याचे सांगलीतील जवान योगेश आलदर याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
आलदर कुटुंब मुळचे कोळे (ता. सांगोला) येथील आहे. कोळे येथील अनेक कुटुंबे पोटापाण्यासाठी सांगलीत स्थायिक आहेत. योगेशच्या वडिलांचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे. शालेय जीवनात असतानाच त्याला आठवी-नववीपासून सैन्यात जाण्याचे वेड होते. शांतिनिकेतन येथील शाळेत शिकत असतानाच घराजवळ असलेल्या मैदानावर सराव करत होता. बारावी झाल्यानंतर तो २०१९ मध्ये सैन्य दलात भरती झाला. घरातील सर्वांनाच आनंद झाला. योगेश सध्या मेकॅनाइज्ड इन्फंट्रीमध्ये तो रणगाडा चालक म्हणून कार्यरत होता. त्याची नियुक्ती राजस्थानमधील श्री गंगानगर भागात आहे.
पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याच्या लग्नाच्या हालचाली सुरू झाल्या. बाज (ता. जत) येथील मुलगी पसंत पडली. ५ मे रोजी लग्न ठरले. त्यामुळे दि. ३० एप्रिल रोजी तो ४० दिवसाची सुटी घेऊन सांगलीत आला. ५ मे रोजी लग्न झाले. सर्व कुटुंबीय आनंदात होते. तेवढ्यात सीमेवर युद्ध सुरू झाल्यामुळे सैन्यदलाच्या सुट्या रद्द करून सर्वांना परत बोलवण्यात आले. दि. ७ रोजी योगेशने मोबाइलवर मेसेज पाहिला.
वाचा- ...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
कर्तव्यावर हजर होणे अत्यंत महत्वाचे
पुन्हा कर्तव्यावर जावे लागणार असल्याचे सांगताच पत्नीसह सर्वांना धक्का बसला. सर्वांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. ‘आत्ताच लग्न झाले आहे, अजून अंगावरची हळद निघाली नाही, जाऊ नकोस’ असे सर्वजण विनवणी करू लागले. परंतु योगेशने कशीबशी सर्वांची समजूत काढली. सर्व सहकारी जवान हजर झाले आहेत, देशसेवेसाठी जाणे आवश्यक असल्याचे समजावून सांगितले. शनिवारी दुपारी सांगलीतून राजस्थानकडे रवाना होत आहे. राजस्थान परिसरात अद्याप युद्धाच्या हालचाली नसल्या तरी सर्व सैनिक सज्ज आहेत. त्यामुळे जावेच लागणार असल्याचे योगेशने सांगितले.
आजी-आजोबांच्या डोळ्यात पाणी
नातवाला सैन्यात नोकरी लागली, लग्नही झाले म्हणून योगेशचे आजी-आजोबा आनंदात होते. परंतु जेव्हा योगेशला परत ड्युटीवर बोलवल्याचे समजले तेव्हा धक्काच बसला. शुक्रवारी योगेश भेटायला गेल्यानंतर त्यांनी रडतच त्याला आणखी थोडे दिवस थांब अशी विनंती केली. परंतु योगेशने त्यांची कशीबशी समजूत काढली.