Sangli Crime: पैसे देण्याच्या बहाण्याने मळ्यात बोलावले, महिलेचा गळा दाबून खून केला; मृतदेह दुचाकीसह कृष्णा नदीत फेकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 12:08 IST2025-11-06T12:08:24+5:302025-11-06T12:08:53+5:30
बोरगाव येथील घटना, मृतदेहाचा शोध सुरू

Sangli Crime: पैसे देण्याच्या बहाण्याने मळ्यात बोलावले, महिलेचा गळा दाबून खून केला; मृतदेह दुचाकीसह कृष्णा नदीत फेकला
बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथे रसिका मल्लेशी कदम (वय ३४, रा. जत, सध्या रा. ईश्वरपूर) या विवाहित महिलेचा आरोपी तुकाराम शंकर वाटेगावकर (३८, रा. बोरगाव) याने मंगळवारी गळा आवळून खून केला. आरोपीने खुनानंतर मृतदेह पोत्यात भरून महिलेच्या दुचाकीसह ताकारीच्या पुलावरून कृष्णा नदीत फेकला. पोलिसांना नदीतून दुचाकी मिळाली असून, मृतदेह अद्याप सापडला नाही. मृत महिला व आरोपीच्यात संबंध होते. त्यातून निर्माण झालेल्या वादातून खून केल्याची कबुली आरोपीने दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जत येथून मजुरीसाठी आलेल्या कुटुंबातील रसिका कदम व आरोपी तुकाराम वाटेगावकर या दोघांचे सात वर्षांपासून संबंध होते. रसिका या खानावळीत चपाती लाटण्याचे काम करत होत्या. आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रसिका या पैशाची मागणी करत होत्या. गेल्या वर्षभरापासून या दोघांमध्ये वारंवार पैशावरून भांडण सुरू होते.
दिवाळीपूर्वी रसिका या तुकारामच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी तुकाराम व त्यांच्या पत्नीसोबत रसिका यांचे भांडण झाले होते. याचा राग मनात धरून तुकाराम याने रसिकाच्या घरी जाऊन मद्यधुंद अवस्थेत दंगा केला होता. आजूबाजूच्या लोकांनी तुकारामला चोपही दिला होता. हे भांडण पोलिसांत गेले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना समज दिली होती.
तुकारामने महिलेला पैसे देण्याच्या बहाण्याने मंगळवारी बोरगावला मळ्यात बोलावले. रात्री ९च्या सुमारास शेतातील शेडमध्ये तिचा गळा दाबून खून केला. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक समाधान घुगे करत आहेत. मृत रसिकाच्या पश्चात पती, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
मृतदेह पोत्यात भरून नदीत टाकला
खून केल्यानंतर तुकारामने महिलेचा मृतदेह पोत्यात भरून तिच्याच दुचाकीवरून नेला. ताकारीच्या पुलावरून दुचाकीसह मृतदेह नदीत फेकून दिला. रात्रभर आई घरी आली नसल्याने रसिकाच्या मुलाने ईश्वरपूर पोलिसांत आई बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली.
गुन्ह्याची कबुली
महिलेच्या कुटुंबीयांनी तुकारामवर संशय व्यक्त केला. पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी दुपारी चार वाजल्यापासून पाण्यात मृतदेहाचा शोध घेतला. पाण्यात टाकलेली दुचाकी सापडली; मात्र उशिरापर्यंत मृतदेह सापडला नाही.