Sangli: एमडी ड्रग्जप्रकरणी जागामालक महिलेस अटक, परवानगीविना शेड दिल्यानेच संशयितांकडून ड्रग्जचे उत्पादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 13:13 IST2025-02-06T13:13:32+5:302025-02-06T13:13:46+5:30
आतापर्यंत सातजणांना अटक

Sangli: एमडी ड्रग्जप्रकरणी जागामालक महिलेस अटक, परवानगीविना शेड दिल्यानेच संशयितांकडून ड्रग्जचे उत्पादन
विटा/ सांगली : कार्वे (ता. खानापूर) येथील औद्योगिक वसाहतीमधील माउली इंडस्ट्रीज या बंद कारखान्याचे शेड कोणत्याही परवानगीविना एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्यांना भाड्याने दिल्याबद्दल गोकुळा विठ्ठल पाटील (४७, रा. पाटील वस्ती, विटा) यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. एमडी ड्रग्जच्या उत्पादनात त्यांचा सहभाग आहे काय? याचा पोलिस तपास करत आहेत.
कार्वे औद्योगिक वसाहतीत माउली इंडस्ट्रिज हा कारखाना गोकुळा पाटील यांच्या मालकीचा आहे. कारखान्याची जागा २०२० मध्ये जावळे नामक व्यक्तीने गोकुळा पाटील यांना औद्योगिक विकास महामंडळाच्या परवानगीने हस्तांतरित केली होती. या जागेत तार, खिळे तयार करण्याची परवानगी पाटील यांनी औद्योगिक विकास महामंडळाकडून घेतली होती. मात्र, कारखाना सुरू केला नसल्याने महामंडळाने त्यांना दीड वर्षापूर्वी नोटीस बजावली होती.
एमडी ड्रग्ज प्रकरणातील संशयित राहुदीप बोरिचा, बलराज कातारी यांनी गोकुळा पाटील यांच्याकडे अत्तर तयार करण्यासाठी शेड मागितले होते. शेड भाड्याने मागणाऱ्या बलराज कातारी याच्याकडे कोणत्याही व्यवसायाचा परवाना नाही. याची खात्री न करता करारपत्र केले. भाडे करार अधिकृत केला नाही. तसेच औद्योगिक विकास महामंडळाला याची कोणतीच कल्पना दिली नाही. कारखान्यात केमिकल्सचा वापर आणि परफ्युमचे उत्पादन करणार असल्याचे सांगितले. तरी प्रदूषण नियंत्रण मंडळालादेखील याची माहिती दिली नाही. त्यांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती.
गोकुळा पाटील यांनी कोणतीही खातरजमा न करता शेड भाड्याने दिल्याने संशयितांनी एमडी ड्रग्जचे उत्पादन सुरू केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. प्राथमिक तपासात गोकुळा पाटील यांना बेकायदेशीर बाबींबद्दल मंगळवारी रात्री अटक केली. अटकेपूर्वी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता अपर अधीक्षक रितू खोखर यांनी विटा येथे येऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची चौकशी करून रात्री उशिरा अटक केली.
पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर करार
गोकुळा पाटील यांनी पाचशे रुपयाच्या स्टॅम्पपेपरवर करार केला होता. या करारावर कोणत्याही साक्षीदाराची सही नाही. तसेच कराराचे कोणत्याही प्रकारे रजिस्ट्रेशन केलेले नाही. तसेच कराराच्या तारखेमध्येही फेरफार केला आहे. पोलिस तपासात या सर्व बाबी निदर्शनास आल्या आहेत.
आतापर्यंत सातजणांना अटक
ड्रग्ज प्रकरणात राहुदीप बोरिचा, सुलेमान शेख, बलराज कातारी, जितेंद्र परमार, अब्दुलरज्जाक शेख, सरदार पाटील या सहाजणांना अटक केली. त्यानंतर गोकुळा विठ्ठल पाटील यांना अटक केली.
गोकुळा पाटील यांनी कोणत्याही कायदेशीर परवानगीविना माउली इंडस्ट्रीज हा कारखाना भाड्याने दिला होता. त्यामुळे तेथे एमडी ड्रग्जचे उत्पादन करण्यात आले. पाटील यांना अटक केली आहे. ड्रग्जच्या प्रकरणात त्यांचा सहभाग आहे की नाही याची कसून तपासणी केली जाईल. - सतीश शिंदे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण