नवऱ्यापासून घटस्फोट घेऊन लग्न करण्याचे वचन, महिलेचा मिरजेतील पायलटला ५९ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 17:42 IST2022-06-20T17:42:00+5:302022-06-20T17:42:39+5:30
ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. हना खान हिने ती विवाहित असल्याचे सांगून पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेऊन लग्न करण्याचे खोटे वचन अतिष शिंगे यांना दिले.

नवऱ्यापासून घटस्फोट घेऊन लग्न करण्याचे वचन, महिलेचा मिरजेतील पायलटला ५९ लाखांचा गंडा
मिरज : मिरजेतील पायलटला लग्नाचे आमिष दाखवून नोएडा (उत्तरप्रदेश) येथील महिलेने त्याची तब्बल ५८ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत अतिष शशिकांत शिंगे (वय ४८, रा. सुंदरनगर, मिरज, सध्या रा. गोरेगाव, मुंबई) यांनी हना मोहसीन खान या महिलेविरुद्ध गांधी चौक पोलिसात फिर्याद दिली आहे.
मिरजेतील अतिष शशिकांत शिंगे हे पायलट आहेत. त्यांची ओळख नोएडा (उत्तरप्रदेश) येथील हना मोहसीन खान या महिलेशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. हना खान हिने ती विवाहित असल्याचे सांगून पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेऊन लग्न करण्याचे खोटे वचन अतिष शिंगे यांना दिले. पायलट बनण्यासाठी अतिष शिंगे यांच्याकडे पैशाची मागणी करून पायलट झाल्यानंतर घेतलेली रक्कम हना खान हिच्या नावावर असलेली जमीन विक्री करून किंवा ती जमीन अतिष शिंगे यांच्या नावावर करून देण्याचे आश्वासन दिले.
हना खान हिच्या वडिलांच्या नावावर असलेल्या जमिनीची विक्री करून शासनाकडून मिळणाऱ्या १२ कोटी रकमेतील काही रक्कम देण्याचेही आमिष दाखविले. अतिष शिंगे यांच्याकडून हना खान हिने गेल्या सहा वर्षांत तिच्या बँक खात्यावर, अतिष शिंगे यांच्या मिरजेतील घरी, मुंबई व मंगलोर येथे ९८ हजार २०१ अमेरिकन डॉलर, म्हणजे ५८ लाख ९२ हजार रुपये रक्कम घेतली. काही कालावधीनंतर ही रक्कम परत मागितल्यानंतर हना खान हिने पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अतिष शिंगे यांनी तिच्या विरोधात पोलिसात फिर्याद देणार असल्याचे तिला सांगितले.
यानंतर हना खान हिने अतिष शिंगे यांच्या आई यमूताई शिंगे यांना फोन करून पोलिसात तक्रार केल्यास अतिष शिंगे यांनाही खोट्या केसेसमध्ये अडकविण्याची धमकी दिल्याचे अतिष शिंगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत गांधी चौक पोलिसात हना खान हिच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.