दामदुप्पटच्या आमिषाने महिलेची दहा लाखांची फसवणूक, सांगलीतील तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 16:23 IST2025-09-13T16:22:28+5:302025-09-13T16:23:25+5:30
वारंवार पाठपुरावा करून पैशाची मागणी केली; परंतु पैसे देण्यास टाळाटाळ

दामदुप्पटच्या आमिषाने महिलेची दहा लाखांची फसवणूक, सांगलीतील तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल
सांगली : सोळा महिन्यांत दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून अनुजा अभिजित पवार (वय ४२, रा. शिवशक्ती कॉलनी, जयसिंगपूर) या महिलेची १० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत संशयित उमेश जगन्नाथ जोशी (वय ४५), अस्मिता जोशी (वय ४०, दोघेही रा. मुरली ॲपेक्स अपार्टमेंट, विश्रामबाग, सांगली) आणि संतोष सुधाकर पाठक (वय ५४, रा. श्री बंगला, दत्त मंदिरासमोर, यशवंतनगर, सांगली) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी अनुजा पवार आणि संशयितांची ओळख होती. त्यांना विश्वासात घेऊन कमी कालावधीत दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखविले. त्याला बळी पडून अनुजा पवार यांनी त्यांच्याकडील १० लाख १६ महिन्यांकरिता संशयितांकडे गुंतविले. फसवणुकीचा प्रकार दि. १५ सप्टेंबर २०२२ ते दि. ११ सप्टेंबर २०२५ या कालावधीत घडला.
पैसे गुंतवूनदेखील त्यांना १६ महिन्यांत दामदुप्पट रक्कम न मिळाल्याने अनुजा पवार यांना फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यानंतर त्यांनी वारंवार संशयितांकडे पाठपुरावा करून पैशाची मागणी केली; परंतु पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने अनुजा पवार यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.