शासकीय खरेदीतील गैरकारभार खपवून घेणार नाही, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 19:17 IST2025-07-22T19:16:40+5:302025-07-22T19:17:07+5:30
ऑगस्टपर्यंत निधी खर्च न झाल्यास तो परत जाणार

शासकीय खरेदीतील गैरकारभार खपवून घेणार नाही, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना सुनावले
सांगली : जिल्हा परिषदेतील सीसीटीव्हीसह अन्य साहित्य खरेदीबद्दल तक्रारी होत आहेत. यामध्ये खरेच अधिकाऱ्यांनी गैरकारभार केला असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला, तसेच ऑगस्टपर्यंत जिल्हा नियोजनचा निधी खर्च झाला नाही तर तो शासनाकडे परत जाणार आहे. म्हणून अधिकाऱ्यांनी वेळेत निधी खर्च करा, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जिल्हा वार्षिक योजनेतील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी तृप्ती धोडमिसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, महिला व बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता संजय येवले, कृषी विकास अधिकारी मनोज वेताळ उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा नियोजनमधून देण्यात येणाऱ्या निधी खर्चासाठी दोन वर्षांची मुदत आहे. मात्र, वित्त विभागातील नवीन प्रणालीमुळे निधी खर्चात अडथळे येत आहेत. त्यामुळे आलेला निधी एका वर्षातच खर्च करण्यासाठी नियोजन करा, तसेच यावर्षी एका रुपयाचाही निधी अखर्चित राहणार नाही, याची दक्षता घ्या. अनेक कामांसाठी निधी आला आहे. मात्र, प्रशासकीय मान्यता आणि कार्यारंभ आदेश नसल्यामुळे कामाची सुरुवात झाली नाही, हे बरोबर नाही. प्रशासकीय मान्यता आणि कार्यारंभ आदेश तातडीने द्या.
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीची लवकरच आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे १५ ऑगस्टपर्यंत सर्व कामांचे कार्यारंभ आदेश द्यावेत. कामामध्ये गुणवत्ता ठेवण्याची गरज आहे. शिक्षण विभागाने शाळेत सीसीटीव्ही बसविले आहेत. मात्र, खरेदी प्रक्रियेमध्ये गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी येत आहेत. चुकीचे झाले असेल तर खपवून घेतले जाणार नाही आणि प्रक्रिया योग्य प्रकारे झाली असल्यास तसा खुलासा करा, तसेच सीसीटीव्ही, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन तेथील कामांची गुणवत्ता तपासणार आहे. यामध्ये दोषींवर कठोर कारवाई करणार आहे, असेही ते म्हणाले.